भगूर बसस्थानकालगत जुगारी, मद्यपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:12 AM2020-02-11T00:12:06+5:302020-02-11T01:09:49+5:30
भगूर बसस्थानकालगत रेल्वेच्या मालकीच्या दगडीचाळीचा वापर गैरकृत्यांकरिता होत असून, सदर जागा मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरात बसलेले असतात. रेल्वे व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष न घातल्यास या परिसरात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देवळाली कॅम्प : भगूर बसस्थानकालगत रेल्वेच्या मालकीच्या दगडीचाळीचा वापर गैरकृत्यांकरिता होत असून, सदर जागा मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरात बसलेले असतात. रेल्वे व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष न घातल्यास या परिसरात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भगूर बसस्थानकालगत ब्रिटिश काळापासून रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत असून, या वसाहतीचे सर्व काम दगडात केलेले असल्याने दगडीचाळ नामकरण झालेले आहे. सध्या दगडीचाळीची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे दिवसभर प्रेमीयुगुल तसेच रात्री मद्यपींंसह अनेक अवैध धंदेवाल्यांनी या परिसरात ठिय्या मांडला आहे.
पूर्वी रेल्वे प्रशासनाने अकरा कुटुंबे राहू शकतील, अशी इमारत उभारली होती.
गेल्या दहा वर्षांत एकही कर्मचारी येथे राहण्यास न आल्याने रेल्वेच्या अकरा सदनिका ओस पडून आहेत. सदर ठिकाण बसस्थानक व रेल्वे गेट या दोन्ही परिसराला जोडणारे असून याठिकाणी प्रेमीयुगुल खुलेपणाने फिरत असतात, त्याचप्रमाणे
सायंकाळनंतर दारूच्या पार्ट्यांनाही सुरुवात होते.
अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरातून आपली सूत्रे हलवतात. या पडीक इमारतीबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा रेल्वेला कळवून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस प्रशासनाला तर या जागेचा पत्ताच नसल्याचे कळते. सध्या येथे मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या, पाण्याच्या बाटल्या साचलेल्या असून, गादी, चटई व इतर वस्तू प्रत्येक घरात आढळून येत आहे. रेल्वे प्रशासनाला बांधलेल्या वास्तूचा विसर तर पडला नाही ना? असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.