कोराेनाकाळात गुळवेलने दिला १८०० आदिवासींना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:09+5:302021-05-19T04:15:09+5:30
विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी गुळवेल या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. मधुमेहावरदेखील हे प्रभावी औषध मानले जाते. ...
विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी गुळवेल या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. मधुमेहावरदेखील हे प्रभावी औषध मानले जाते. त्याचा अर्क, द्रव, भुकटी किंवा त्याचा गर काढून वापरला जातो. आयुर्वेदात गुळवेल या वनौषधीला सध्या मोठी मागणी आहे.
सुनील पवार या कातकरी समाजातल्या २७ वर्षांच्या युवकाने आपल्या दहा-बारा मित्रांसोबत आपल्या मूळगावी महसूल कार्यालयासमोर समाजातल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. यासाठी आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू असून, संस्थेचे ५१ सभासद असून, संस्थेला १८०० लोकांकडून गुळवेलचा पुरवठा होतो. संस्थेला जेव्हा मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेने सुनीलला मदतीचा हात देत, त्याला आणखी २५ लाख रुपयांची मदत करण्यात आली. ट्रायफेड अंतर्गत, या भागातील सहा वन धन केंद्रांना प्रत्येकी पाच लाख एवढी मदत देण्यात आली. आज शहापूर तालुक्यात सहा केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांमध्ये गुळवेल प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या उद्योगामुळे कोविड टाळेबंदीच्या काळातही १८०० आदिवासींना उत्पनाचे साधन मिळाले आहे.
कोट-
ज्या कंपनीची मोठी ऑर्डर आहे, त्या कंपनीला आजपर्यंत आम्ही ३५ टन माल पुरविला आहे. मात्र कंपनीकडून दर कमी दिला जात असल्यामुळे तो अधिक वाढवून मिळावा यासाठी कंपनीशी पत्रव्यवहार सुरू आहे. कंपनीही त्याला सकात्मक प्रतिसाद देत आहे. आमच्या संस्थेला शबरी आदिवासी विकाम महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले आहे. - सुनील पवार, संस्थापक