जिल्ह्यात महिनाभरात ३२,५९३ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 08:20 PM2021-05-29T20:20:37+5:302021-05-29T23:59:18+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख आता हळूहळू घसरणीला लागला आहे. ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात तब्बल साडेअकरा हजार बाधित ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख आता हळूहळू घसरणीला लागला आहे. ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात तब्बल साडेअकरा हजार बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ हजार ५०० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात बरे होण्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यात महिनाभरात सुमारे २८०० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. नाशिक जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. दि. २९ एप्रिल २०२१ रोजी जिल्ह्यात तब्बल ४४ हजार ५८० रुग्ण उपचार घेत होते. दि. २९ मे रोजी ही रुग्णसंख्या ११ हजार ९८७ आहे.
नाशिक ग्रामीण भागात २९ एप्रिल रोजी १७ हजार २३० रुग्ण होते. ती संख्या २९ मे रोजी ५ हजार ६९३ वर आलेली आहे. त्यावेळी सर्व रुग्णालये, कोविड सेंटर्स रुग्णांनी भरून गेलेली होती. अनेकांची ऑक्सिजनअभावी परवड झाली, तर अनेकांना व्हेंटिलेटर्स न मिळाल्याने जीव गमवावा लागला.
रुग्णालयात बेड मिळेनासे झाले होते, तर रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरू होती. महिनाभरापूर्वी असलेले हे चित्र आता खूपसे बदलल्याचे दिसून येत आहे. दि. २९ एप्रिल रोजी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.८२ टक्के इतकी होती. ती आता २९ मे रोजी ९५.६८ टक्के इतकी झाली आहे. जवळपास १०.८६ टक्क्यांनी कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनाबाधितांचा घसरणीला लागलेला हा आलेख प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारा ठरत आहे. शिवाय, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने निर्बंध हळूहळू शिथिल होत जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
निफाड, सिन्नरमध्ये कमालीची घसरण
जिल्ह्यात निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात सर्वाधिक रुग्ण होते. दि. २९ एप्रिल रोजी निफाड तालुक्यात ३४२५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील २७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६२७ रुग्ण उपचार घेत आहेत. निफाड तालुक्यात अनेक गावांनी कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले.
जवळपास १२ दिवस बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने घटण्यास मदत होऊ शकली. निफाडपाठोपाठ सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या मोठी होती. सिन्नर तालुक्यात दि. २९ एप्रिल रोजी १६४० रुग्ण होते. ती संख्या आता ६५४ वर आलेली आहे. देवळा, बागलाण, चांदवड, दिंडोरी, येवला या तालुक्यांतही रुग्णसंख्येतील घट दिलासादायक मानली जात आहे.
दि. २९ एप्रिल २०२१
रुग्णसंख्या - ४४,५८०
कोरोनामुक्तीची टक्केवारी - ८४.८२ टक्के
दि. २९ मे २०२१
रुग्णसंख्या - ११,९८७
कोरोनामुक्तीची टक्केवारी - ९५.६८ टक्के