दसऱ्याच्या शुभेच्छा पोहोचल्या कोजागरीला
By Admin | Published: October 16, 2016 02:16 AM2016-10-16T02:16:13+5:302016-10-16T02:17:11+5:30
फुलले हास्य : इंटरनेट सुरू; धडकले मेसेजेस
नाशिक : तळेगाव प्रकरणामुळे तब्बल पाच दिवसानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शनिवारी (दि. १५) दुपारी सुरू झाल्याने नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; मात्र काही मिनिटातच हजारोंच्या संख्येने मेसेजेस धडकल्याने अनेकांचे मोबाइल हॅँग झाले, तर दसऱ्याच्या शुभेच्छा थेट कोजागरीलाच मिळाल्याने अनेकजण अवाक्ही झाले.
तळेगाव प्र्रकरणाचा सोशल मीडियावर वाढता उद्रेक लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने १० आॅक्टोबर रोजी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केले. दरम्यान, जिल्ह्यात सामाजिक शांतता निर्माण होऊन तणाव पूर्णत: निवळल्याने प्रशासनाने शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंटरनेट सेवा पूर्ववत केली. यामुळे नाशिककरांच्या चेहऱ्यावर अक्षरश: हास्य फुलले. अनेकांनी तर हा आनंद ग्रुपवर मेसेजेस पाठवून साजरा केला.
‘दहावी पास झाल्यावर जितका आनंद नाही झाला; तितका आज इंटरनेट सुरू केल्यावर झाला- एक नाशिककर’ अशा आशयाचे मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुपवर दिवसभर झळकत होते.
तर दसऱ्याचे मेसेज थेट कोजागरीला मिळत असल्याने अनेकजण अवाक्ही झाले. यावर शक्कल म्हणून काहींनी तर दसरा, कोजागरीसह दिवाळीचेही मेसेजेस शेअर केले. ‘पुन्हा इंटरनेट सेवा बंद केल्यास आजच दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात’ असे गमतीशीर मेसेजेसही शेअर केले.
दरम्यान, इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर एकापाठोपाठ हजारोंच्या संख्येने मेसेजेस धडकल्याने अनेकांचे मोबाइल हॅँग झाले. यावर तोडगा म्हणून अनेकांनी थेट व्हॉट्सअॅपच अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केला. तर काहीजण तासन्तास केवळ मेसेजेस वाचण्यात दंग झाले होते. दिवसभर सुरू असलेल्या या इंटरनेट नाट्यामुळे जणू काही नाशिककरांची ‘एखादी हरवलेली प्रिय वस्तू परत मिळाल्याच्या आनंद’ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.