कालिदाससमोरील ‘दुष्यंत-शकुंतला’ शिल्प अद्यापही अडगळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:20+5:302021-07-11T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ या जगविख्यात साहित्यकृतीचे शिल्प प्रत्येक रसिकाची दाद मिळवत असे. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ या जगविख्यात साहित्यकृतीचे शिल्प प्रत्येक रसिकाची दाद मिळवत असे. मात्र, कालिदास कलामंदिराबाहेरील एका छोट्याशा वाटिकासदृश जागेत वनविहार करणाऱ्या शकुंतलेवर मोहीत होणारा राजा दुष्यंत, असे ते सुंदर शिल्प आधी डागडुजीच्या नावाखाली हलवले गेले. नंतर कोट्यवधी खर्च करून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणदेखील होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला. आता तर कालिदास बाहेरील ती वाटिकाच (आयलँड) नामशेष होऊन त्या जागेवरील अप्रतिम शिल्प स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासमोरील महापालिकेच्या जागेत अडगळीत अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र, ना मनपा प्रशासनाला त्याचा खेद, ना महापालिकेच्या धुरीणांना खंत.
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृतचे महान कवी आणि रचनाकार, नाटककार होते. किंबहुना भारताच्या ज्ञात इतिहासातील सर्वकालीन श्रेष्ठ महाकवी म्हणून त्यांना गौरविले जाते. कवी कुलगुरू कालिदासांच्या रघुवंश, मेघदूतम, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्, ऋतुसंहार या रचना कालातीत ठरल्या. अशा या महाकवीच्या नावाने साकारण्यात आलेल्या कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच हे दुष्यंत-शकुंतलेचे मनोहारी शिल्प या कलामंदिराच्या प्रवेशद्वारावरच रसिकांची दाद घेऊन जात असे. त्या शिल्पाच्या कलाकृतीवर बाहेरून नाटकांसाठी येणारे मोठमोठे कलाकार, अभिनेतेदेखील लुब्ध होऊन प्रशंसा करायचे. एकुणातच ते शिल्प हे कालिदास कलामंदिराचे वेगळेपण तसेच नाशिककरांच्या रसिकतेचे दर्शन घडवत प्रदीर्घ काळ उभे होते.
इन्फो
निदान कलामंदिराच्या उद्यानात तरी द्यावे स्थान
कालिदासच्या नूतनीकरणानंतर आता तर कालिदाससमोरील रस्त्याचेही नूतनीकरण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पण डागडुजीच्या नावाखाली हलवले गेलेले शिल्प पुन्हा परत बसवलेच गेले नसल्याची खंत रसिक नाशिककरांना लागली आहे. नूतनीकृत रस्त्यावर शक्य नसल्यास कालिदास कलामंदिराच्या आवारातील उद्यानात तरी ते शिल्प महापालिकेच्या धुरीणांनी पुन्हा बसवून नाशिककरांच्या रसिकतेचा प्रत्यय देणारे शिल्प पुन्हा साकारावे अशीच समस्त नाशिककर रसिकांची इच्छा आहे.
इन्फो
म्हणून दिले नाव महाकवी कालिदासाचे
या कलामंदिराच्या जागेवर पूर्वी तमाशा थिएटर होते. त्या जागेवर नाट्यमंदिर उभारायचा निर्णय घेऊन त्याला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे नाव देण्याचा निर्णयही मनपाच्या तत्कालीन धुरीणांनी घेतला होता. मात्र, स्वत: तात्यासाहेबांनी या नाट्यमंदिरास आपले नाव नको, तर कवी कुलगुरू कालिदास यांचे नाव देण्यास सांगितले. त्यामुळेच त्या नाट्यमंदिराचे नामकरण कालिदास नाट्यमंदिर असे झाले होते.
इन्फो
कालिदास दिनाचे माहात्म्य
कालिदास यांच्या काल निश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद असले तरी ते भारताचे सर्वश्रेष्ठ महाकवी होते, हे भारतीयच नव्हे तर जर्मनीचा जगविख्यात महाकवी गटेनेदेखील मान्य केले होते. कालिदासांच्या ‘मेघदूतम्’ या खण्डकाव्यात त्यांनी आषाढातील पहिल्या दिवशी यक्षाने पाहिलेल्या अजस्र, मत्त हत्तीसारख्या आकाराच्या पावसाळी ढगाचे वर्णन केले आहे. आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाने या मेघरूपी गजराजालाच आपला दूत बनवून स्वतःची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी आपल्या पत्नीकडे धाडलेला आहे. ही कल्पना संस्कृत साहित्यात पुढे इतकी वाखाणली गेली की यात वर्णन केलेले पहिलेच शब्द आषाढस्य प्रथम दिवसे हाच ‘कालिदास दिन’ म्हणूनच साजरा होऊ लागला.
---------------
कविकुलगुरू कालिदास दिन विशेष
(फोटो राजू ठाकरे देणार आहेत)