गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी गर्दी

By Admin | Published: March 9, 2016 10:04 PM2016-03-09T22:04:26+5:302016-03-09T22:15:10+5:30

जोगलटेंभी : स्नान केल्यानंतर महादेव मंदिरात रांगा

Dusk on Dusara-Darna Sangam | गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी गर्दी

गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी गर्दी

googlenewsNext

 नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदा-दारणेच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
जोगलटेंभी येथे गोदावरी व दारणा या दोन नद्यांचा दक्षिणमुखी संगम असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर भाविकांचा ओघ वाढता राहिल्याने नायगाव-जोगलटेंभी रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.
गावातील तरुण पार्किंगची व्यवस्था चोखपणे पार पाडताना दिसत होते. संगमावर पर्यटन विकास निधीतून विविध विकासकामे करण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. गत वर्षीच्या तुलनेत यंदा नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी व पाणवेली जास्त असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
संगमावर स्नान करून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. उन्हाच्या तीव्र झळा अंगाला जाणवत असतानाही गर्दीचे प्रमाण सायंकाळपर्यंत वाढत होते. खेळणी व खाऊच्या दुकानांची संख्याही यंदा यात्रेत वाढल्याचे दिसून आले. संगमाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी होडी चालकांकडे भाविकांची गर्दी दिसून आली.
नायगावसह जायगााव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी व निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी संगमावर गर्दी केली होती. सरपंच शशिकांत पाटील, उपसरपंच विष्णू तांबे, विलास गाडेकर, गोदा युनियनचे संचालक बाबजी पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजुरकर, सुदाम कमोद, संजय जाधव आदींसह ग्रामस्थांनी यात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने यात्रेत आरोग्य शिबिर घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इगतपुरी आगाराच्या उत्पन्नात वाढ
इगतपुरी : येथील आगारातून टाकेद येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जादा बसेसची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षापेक्षा यंदा दुप्पट उत्पन्न झाले, अशी माहिती आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांनी दिली.
तीन दिवसांपासून महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे एकूण दहा जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. सदर जादा बस सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत धावत होत्या. जवळपास एकूण तीन हजार २२६ कि.मी. वाहतूक करून एक लाख २९ हजार ७९६ एवढे मागील वर्षीपेक्षा दुपटीने उत्पन्नात वाढ झाली. सदर उत्पन्न वाढीसाठी विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, विभाग वाहतूक अधिकारी सागर पलसुले, एम. सी. सपकळे यांचे मार्गदर्शन लाभले. वाहतुकीसाठी आगार व्यवस्थापक चतुर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एस. महाजन, चालक-वाहक यांनी पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Dusk on Dusara-Darna Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.