ग्रामपंचायती निवडणुकांचा आजपासून उडणार धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:51 PM2020-12-22T22:51:25+5:302020-12-23T00:51:47+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप विरोध बळकट करत एकत्रित लढण्याचा निर्धार केला असल्याने नेत्यांचीही त्या दृष्टीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची मुदत संपून त्यावर सध्या प्रशासक नियुक्त आहे. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार, दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुक उमेदवारांना दि. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मात्र, शासकीय सुटीच्या दिवशी म्हणजे दि. २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार असून, ४ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी वैध उमेदवारांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, दि. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
इन्फो
२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्य
विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक स्तरावर गट-तटामध्ये लढल्या जात असल्याने या ठिकाणी राजकीय पक्षांना फारसा वाव नसतो. तरीही जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपनेही ग्रामीण भागात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी गावपातळीवर मात्र पॅनलनिर्मितीला वेग आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
या तालुक्यात होणार निवडणुका
नाशिक - २५
त्र्यंबकेश्वर - ०३
दिंडोरी - ६०
इगतपुरी - ०८
निफाड - ६५
सिन्नर - १००
येवला - ६९
मालेगाव - ९९
नांदगाव - ५९
चांदवड - ५३
कळवण - २९
बागलाण - ४०
देवळा - ११
एकूण - ६२१