बाजारपेठ परिसरात मनपा पुरविणार डस्टबिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:09 AM2017-08-29T01:09:08+5:302017-08-29T01:09:14+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील बाजारपेठांच्या भागात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६०० डस्टबिन खरेदीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील बाजारपेठांच्या भागात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६०० डस्टबिन खरेदीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरात व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे आवाहन करतानाच घंटागाडी ठेकेदारांकडून नागरिकांना डस्टबिन पुरविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, काही ठेकेदारांनी डस्टबिनचे वाटपही केले आहे. आता महापालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागात ओला व सुका कचरा संकलनासाठी हिरव्या व निळ्या डस्टबिन पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात ६०० डस्टबिन खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविली जात आहे. बाजारपेठ परिसरातील व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच डस्टबिनमध्ये टाकण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. दरम्यान, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी बाजारपेठांमधील ठिकाणांची पाहणी करत काही ठिकाणे निश्चित केली.