धूळ खात पडलेली वाहने मिळणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:29 AM2020-10-17T00:29:14+5:302020-10-17T00:29:35+5:30
इगतपुरी तालुक्यातील विस्ताराने मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेली आणि विविध कारणास्तव पोलिसांनी जमा केलेली शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने मूळ मालकांना परत देण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
सर्वतीर्थ टाकेद/घोटी : इगतपुरी तालुक्यातील विस्ताराने मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या घोटी पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेली आणि विविध कारणास्तव पोलिसांनी जमा केलेली शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने मूळ मालकांना परत देण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रदीप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात अशी हजारो वाहने गेली अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेली असून, ती मूळ मालकांना परत करण्यासंदर्भात आदेशित केले आहे.
त्यादृष्टीने घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी संबंधित आदेशाची नोटीस दिली असून, पोलिसांकडे पुरावे सादर करून आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले
आहे.
घोटी पोलीस ठाणे आवारात विविध कारणास्तव जमा केलेली; परंतु सद्य:स्थितीत बेवारस असलेली शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने उभी आहेत.
त्यामुळे त्याची देखभाल आणि इतर जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलिसांनाच मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे त्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. मोकळ्या जागेत असलेल्या घोटी पोलीस ठाण्याला अशा वाहनांमुळे वाहन बाजाराचे स्वरूप आले आहे.