दुतोंड्या मारूती बुडाला; गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:47 PM2019-08-03T15:47:30+5:302019-08-03T15:49:09+5:30

दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 Dutondya Maruti sank; The level of danger exceeded by Godavari | दुतोंड्या मारूती बुडाला; गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

दुतोंड्या मारूती बुडाला; गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

Next
ठळक मुद्दे१७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहितगंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजेपासून विसर्ग करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी येथील कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत आले आहे. त्यामुळे सरदार चौकापासून पुढे गोदाकाठालगतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदाकाठावरील जवळपास सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
गंगापूर धरणातून सातत्याने विसर्गात वाढ करण्यात येत असून सध्या १७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. सकाळी नऊ वाजेपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत दुतोंड्याच्या डोक्याला पूराचे पाणी लागले. यामुळे बालाजी कोठपर्यंत पुराचे पाणी आले होते. गोदावरी नदीवरील घारपूरे घाट पूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
शहरातदेखील मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात १३ हजार ३३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. मागील २४ तासांत शहरात ३३ मि.मी इतका पाऊस नोंदविला गेला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले असून विसर्गात वाढ झाल्यास या पुलावरूनही पूराचे पाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सांडव्यावरील देवी मंदिर पाण्याखाली गेले आहे. यामुळे नदीकाठालगत असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली असून सांडव्यावरील देवी मंदिर, कपालेश्वर मंदिर, सरदार चौक, पिंपळ चौक, बालाजी कोठ, सराफ बाजार या भागातील विक्रेत्यांनी दुकानांमधील विक्रीचे विविध साहित्य सुरक्षित स्थलांतरीत करण्यास सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतले आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले आहेत. गोदाकाठाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दहा जवानांचे रेस्क्यू पथक गस्तीवर आहेत. पूराच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून दंडूका दाखविला जात आहे. रेस्क्यू पथकाकडून वारंवार नदीकाठालगत सावधानतेच्या विविध सुचना ध्वनिक्षेपकांंद्वारे दिल्या जात आहेत. तसेच अग्निशमन दलाचेपथकही गस्तीवर आहे.
संततधार पाऊस आणि पूर बघण्यासाठी बाहेर पडलेले नाशिककर यामुळे शहरातील रविवार कारंजा, अशोक स्तंभ, मालेगावस्टॅन्ड, पंचवटी, सराफ बाजार, दहीपूल, शालीमार या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलीस जणू शहरातून अचानक गायब झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पूलांवर बिकट परिस्थिती पहावयास मिळत आहे.

Web Title:  Dutondya Maruti sank; The level of danger exceeded by Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.