दारणाच्या डोहात बुडून इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:22 PM2018-05-21T14:22:27+5:302018-05-21T14:22:27+5:30
घोटी : वाघेरे ता. इगतपुरी येथे दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
घोटी : वाघेरे ता. इगतपुरी येथे दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या बुडालेल्या इसमाला तब्बल २४ तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. हट्टीपाडा येथील वाळू भाऊ वारे, (40) हे मजुरी निमित्ताने मुंढेगाव येथील खडी क्रशर वर कामासाठी आले होते, सुट्टी असल्याने जवळच दारणानदी पात्रात आपल्या कुटुंबासह मासेमारी करण्यासाठी वाघेरे येथील दारणेच्या पात्रात सकाळी अकरा वाजता गेले होते. पाण्याच्या मध्यभागी पोहताना अचानक पाण्यात बुडू लागले मात्र परिसरात वाचवण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याने कुटूंबाची धावाधाव व्यर्थ ठरली. मुंढेगाव येथील पोलीस पाटील गणपत जाधव, सरपंच संगीता हंबीर यांनी तत्काळ घोटी पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी घटनास्थळी पथक पाठवले. यावेळी घटनास्थळी धाव घेत पोलीस हवालदार सुहास गोसावी यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना सोबत घेत नदी पात्रात शोध कार्य सुरू ठेवले. जवळपास सात तास शोध कार्य सुरू ठेवण्यात आले, मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. दरम्यान आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविल्याने या इसमाचा मृतदेह हाती लागला.