तळवाडे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:15 PM2019-01-06T19:15:13+5:302019-01-06T19:15:52+5:30
तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
सायखेडा : तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नाशिक येथे नेण्यात आले.
सिन्नर निफाड सरहद्दीवरील तळवाडे गावात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे गावात ऊस अथवा बिबट्याला दडून बसता येईल, असे ठिकाण नाही. तरीही गाव कुसाला असलेल्या जाधव यांच्या शेतात असलेल्या विहिरीत बिबट्या रात्रीच्या अंधारात सावजाचा पाटलग करत असताना अचानक पडला, बिबट्याची धडक विहिरीच्या कपारीला लागल्याने डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मधुकर जाधव सकाळी आपल्या शेतात गेल्यावर विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांना सांगितले सांगळे यांनी तत्काळ वन विभागाचे अधिकारी भंडारे यांना दूरध्वनीवरून कळविले. वन विभागाचे कर्मचारी शेख, टेकनर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढले.