पार्किंगमध्ये ई-बाइकचा स्फोट; ५ दुचाकी खाक! नाशिकमध्ये मध्यरात्री घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:37 AM2022-05-18T05:37:06+5:302022-05-18T05:37:38+5:30
पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात अपार्टमेंटच्या वाहनतळात मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. अन्य पाच दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सर्व रहिवासी गाढ झोपेत असताना मध्यरात्री एकापाठोपाठ आवाज झाले व रहिवासी खडबडून जागे झाले. खिडक्या, बाल्कनीमध्ये येऊन डोकावले असता त्यांना वाहनतळात जास्त प्रकाश आणि धुराचे लोट उठत असल्याचे दिसले.
आठ महिन्यांपूर्वी दुचाकीची खरेदी
वाल्मिक पाटील यांनी ८ महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली होती. त्यांनी नेहमीप्रमाणे ही बाईक वाहनतळात उभी केली. अचानक त्यांच्या बाईकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यामुळे अन्य रहिवाशांच्या पाच दुचाकीही जळून राख झाल्या.
धावत्या इलेक्ट्रिक बाइकने घेतला पेट
शिवथर (जि. सातारा) : आरळे (ता. सातारा) येथील पेट्रोलपंपानजीक धावत्या इलेक्ट्रिक बाइकला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात ही बाइक पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्यासुमारास घडली. जयवंत आनंदराव साबळे यांची तुनवाल या कंपनीची इलेक्ट्रिक बाईक असून, या बाइकला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ही बाइक घेऊन त्यांचा मुलगा ओम साबळे हा साताऱ्याला जात होता. पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर बाइकमधून अचानक धूर येऊ लागल्याचे त्याच्या लक्षात आले. बाइक रस्त्याच्या बाजूला घेईपर्यंत बाइकने अचानक पेट घेतला.