नियमांची पालयमल्ली करणाऱ्या २२ हजार चालकांचा ई-चलान प्रणालीला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:00+5:302021-09-23T04:17:00+5:30
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे ई -चालानमार्फत कारवाई केली जात असली तर वाहनचालक ...
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे ई -चालानमार्फत कारवाई केली जात असली तर वाहनचालक हा दंड भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील कारवाईनुसार २२ हजार ५०७ चालकांनी ई- चालान पद्धतीला ठेंगा दाखवत अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने या चालकांना २४ सप्टेंबरपर्यंत दंड भरण्यासाठी मुदत दिली असून, यासंदर्भात त्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. तसेच दंड न भरणाऱ्यांना शनिवारी (दि.२५) जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतीत हजर राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
नाशिक शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जात असून, अनेक ठिकाणी जागेवरच दंड वसूल केला जातो, तर काही प्रकरणांमध्ये ई-चालानमार्फत दंड केला जातो. त्यानुसार वाहन चालकाने ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून दंड भरणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात, ई-चालानकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, प्रलंबित दंडाची रक्कम कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे ही दंडाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू केले असले तरी अपेक्षित यश मिळत नसल्याने अशा चालकांना एसएमएसद्वारे न्यायालयीन कारवाईचा इशारा देत शुक्रवारपर्यंत (दि.२४) दंड भरण्याची मुदत दिली आहे, हा दंड न भरल्यास चालकांना शनिवारी (दि.२५) जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतीत हजर राहण्याचा आदेशही वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांनी दिला आहे.