साठ ठिकाणी उभारणार ई-टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:42 PM2018-07-25T23:42:19+5:302018-07-25T23:42:35+5:30
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल तसेच स्वयंचलित पद्धतीने नियमित साफसफाई होणार असल्याने मनुष्यबळाची बचत होणार आहे.
नाशिक : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल तसेच स्वयंचलित पद्धतीने नियमित साफसफाई होणार असल्याने मनुष्यबळाची बचत होणार आहे. गेल्या काही वर्षांत शहरात पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. शिवाय महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. महिला स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी असल्यामुळे महिलांना कुचंबना सहन करावी लागत असल्याने मध्यंतरी राइट टू पी ही चळवळदेखील सुरू करण्यात आली होती. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार असलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याची योजना स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी अंदाजपत्रकात मांडली आहे. प्रत्येक विभागात प्रायोगिक तत्त्वावर दहा ई-टॉयलेट्स पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येतील, त्यामुळे महापालिकेलाच सर्व खर्च करावा लागणार नाही. स्वयंचलित प्रणाली असलेल्या या स्वच्छतागृहात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा या स्वच्छतागृहांमध्ये असणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनामार्फत सादर व्हावा, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांना विनंती केली जाणार असल्याचे सभापती आडके यांनी सांगितले.
स्वयंचलित प्रणाली हे वैशिष्ट्ये
स्वच्छतेविषयी वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्ट्ये असणार आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी संंबंधिताला एक नाणे (कॉइन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येऊ शकेल. वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही, अशी यात व्यवस्था असल्याने सार्वजनिक शौचालये म्हणजे अस्वच्छता हा समजच पुसला जाण्याची शक्यता आहे.