५० हजारावर किमतीच्या मालासाठी ई-वे बिल: प्रशांत जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:26 AM2018-06-04T00:26:15+5:302018-06-04T00:26:15+5:30
सातपूर: जीएसटी अंतर्गत ५० हजारापेक्षा जास्त विक्री केलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूकदारांजवळ बाळगाव्या लागणाऱ्या करपात्र मालासाठी ई-वे बिल असणे बंधनकारक असल्याने खरेदी-विक्री किंवा मालवाहतूक करणाºयांपैकी एकाने ई-वे बिल नोंदविणे अनिवार्य असल्याचे विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.
सातपूर: जीएसटी अंतर्गत ५० हजारापेक्षा जास्त विक्री केलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूकदारांजवळ बाळगाव्या लागणाऱ्या करपात्र मालासाठी ई-वे बिल असणे बंधनकारक असल्याने खरेदी-विक्री किंवा मालवाहतूक करणाºयांपैकी एकाने ई-वे बिल नोंदविणे अनिवार्य असल्याचे विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले.
सिन्नर येथील निमा कार्यालयात आयोजित ई-वे बिल कार्यशाळेत ते बोलत होते. जोशी यांनी पुढे सांगितले की, ५० हजारापेक्षा अधिक किमतीच्या मालाची वाहतूक कंपनीपासून एक किलोमीटरपर्यंत जरी असली तरी त्याची तपशीलवार माहिती या ई-वे बिलमध्ये देणे बंधनकारक आहे. यात पाठविण्यात येणाºया मालाचे विवरण प्रत्येक मालाला लावलेला जीएसटी याची तंतोतंत माहिती देणे आवश्यक आहे. त्यातच ई-वे बिलाची पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर शासनामार्फत निर्देशित केलेल्या वेळेतच म्हणजेच १०० किलोमीटरसाठी एक दिवस यानुसार आपला विक्री केलेला माल वेळेत पोहोचविणे मालवाहतूक करणाºयांवर बंधनकारक असून, त्यास उशीर झाल्यास करण्यात आलेली वाहतूक ही बेकायदेशीर धरण्यात येईल, असेही जोशी यांनी सांगितले.
नोंदणी करण्यात आलेल्या ई-वे बिल २४ तासांच्या आत रद्द करण्याची मुभा आहे. शासनामार्फत करमुक्त करण्यात आलेल्या वस्तूसाठी ई-वे बिल बनविण्याची आवश्यकता नसल्याची माहिती सीए चेतन बंब यांनी दिली. प्रास्ताविक भाषणात निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, राज्यात २५ मे पासून ई-वे बिल लागू करण्यात आले असून, या बिलामुळे चोरीच्या वाहतुकीला आळा बसणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागृत राहावे. यावेळी व्यासपीठावर निमाचे चिटणीस सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, विक्रीकर अधिकारी सागर शेवाळे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत किरण खाबिया, एस. के. नायर, प्रवीण वाबळे, सचिन कंकरेज, किरण भंडारी, किशोर इंगळे, विजय अष्टुरे, रोमित पटेल, योगेश मोरे, पवन मांगजी आदींसह उद्योजक उपस्थित होते.