यंदा कंपन्यांमध्ये भरघोस बोनस
By admin | Published: October 16, 2016 11:14 PM2016-10-16T23:14:31+5:302016-10-16T23:29:04+5:30
कामगारांची दिवाळी : २0 ते ४0 हजारापर्यंत मिळणार रक्कम
सातपूर : मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील औद्योगिक कामगारांना भरघोस बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. बहुचर्चित महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीतील कामगारांना ७९ हजार रुपयांपर्यंत तर सिएट कामगारांना ४० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळालेला आहे. तर सीटूसंलग्न नाशिक वर्कर्स युनियनने बोनसचे करार करण्यात आघाडी घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट घोंगावत असले तरीही मागील वर्षाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्तीचा बोनस यावर्षी कामगारांना मिळालेला आहे. त्यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. बोनसची रक्कम हातात आल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिवाळी सणाच्या खरेदीला सुरुवात केली आहे.
औद्योगिक कामगारांचे लक्ष लागून राहिलेल्या महिंद्र अॅन्ड महिंंद्र कंपनीतील कामगारांना यावर्षी कमीत कमी २२,७०० रुपये आणि जास्तीत जास्त ७९,४०० रुपये बोनस मिळालेला आहे. बोनसची यशस्वी बोलणी करण्यासाठी युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे यांच्यासह राजेंद्र पवार, परशुराम कानकेकर, लॉरेन्स भंडारे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील औसरकर, भुवनेश्वर पोई आदि पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून कामगारांना भरघोस बोनस मिळवून दिला आहे.
सिएट कंपनीत कामगारांनादेखील यावर्षी कमीत कमी ३० हजार रुपये आणि जास्तीत जास्त ४० हजार रुपयांचा बोनस मिळाला आहे. युनियनचे अध्यक्ष भिवाजी भावले, सरचिटणीस गोकुळ घुगे यांच्यासह प्रमोद बेले, अशोक देसाई, दीपक अनवट, पृथ्वीराज देशमुख, आद्यशंकर यादव आदि पदाधिकाऱ्यांनी कामगारांना भरघोस बोनस मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम हातात मिळाल्याने बाजारपेठा बहरल्या आहेत. (वार्ताहर)