स्काउट-गाइड मेळाव्यात आठ पुरस्कारांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:19 AM2018-02-26T00:19:01+5:302018-02-26T00:19:01+5:30
तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूलने स्काउट-गाइड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारांत सहभाग घेत आठ पुरस्कारांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला.
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूलने स्काउट-गाइड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारांत सहभाग घेत आठ पुरस्कारांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. मेळाव्यात पार पडलेल्या सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. स्काउट पथकाने शोभायात्रा प्रकारात सादर केलेल्या ‘कुरुक्षेत्रातील पांडवांचा विजयरथ’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. तंबू सजावट व पायोनियरिंग प्रकारातील ‘नदीवरील पूल’ याला द्वितीय क्रमांक मिळाला. तर प्रवेशद्वार सजावट व शारीरिक कसरत या दोन्ही प्रकारात विद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला. गाइड पथकाने ‘दरीवरील पूल’ या पायोनियरिंग प्रकारात प्रथम क्रमांक तर ‘तंबू सजावट व प्रवेशद्वार सजावट’ प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. संघनायक ऋषी पांडे व उपसंघनायक आदित्य काळे, संघनायिका पायल वाघमारे व उपसंघनायिका पल्लवी चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. कला शिक्षक काकासाहेब तांबे, सतीश टिळे, संगीत शिक्षक सचिन सानप, सांस्कृतिक विभागप्रमुख राजेंद्र भावसार यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस व स्काउट-गाइडच्या जिल्हाध्यक्ष नीलिमाताई पवार, संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा गौरव शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, आर. जे. थोरात, रंगनाथ खुळे, प्राचार्य शरद रत्नाकर यांच्या हस्ते करण्यात आला.
८० शाळेतील दीडहजार विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात नुकताच चार दिवसीय मेळावा उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील ८० पेक्षा अधिक विद्यालयांचे सुमारे १ हजार ७०० विद्यार्थी यात सहभागी झाले. वडांगळी विद्यालयाचे २२ स्काउटर्स व १७ गाइड्स, शिक्षक देवराम खेताडे, आशालता पाटील, माधुरी रोहम, संदीप पडवळ, राजेश कराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यात सहभागी झाले.