भूकंपामुळे ग्रामस्थांत घबराट
By Admin | Published: October 6, 2016 11:52 PM2016-10-06T23:52:42+5:302016-10-06T23:53:11+5:30
ओतूर : हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट, स्थलांतर न करण्याचे आवाहन
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर येथे गेल्या १० दिवसांपासून भूकंपाचे सतत सौम्य व मोठे धक्के बसत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट व भीती निर्माण झाली आहे. तहसीलदार कैलास चावडे व अधिकाऱ्यांनी यापूर्वीच परिस्थितीची पाहणी केली आहे. दररोज साधारणत: रात्री दोन तीन वेळा २.९ रिश्टर स्केलपर्यंत धक्के बसतात, असे मेरी येथील भूकंप अधिकारी वाघमारे यांनी सांगितले. याबाबत दि. ५ रोजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व भूकंप अधिकारी चारुशीला चौधरी, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी ओतूर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली.
सदर चर्चेत सरपंच दादाजी सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष दादाजी मोरे, रविकांत सोनवणे, रमेश रावले आदिंनी भाग घेतला आहे.
यावेळी खासदार हरिचंंद्र चव्हाण यांनी गावातील घरांची पाहणी केली व भूकंपाविषयी माहिती देऊन तातडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून व उद्या मुख्यमंत्र्यांशी समक्ष भेटून या भूकंपाबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले व नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील भयभीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या भूकंपामुळे गावातील असंख्य नागरिक दुसऱ्या गावी स्थलांतर करत असून काही नागरिक मुला बाळांसह शेतमळ्यात राहायला गेले आहेत.
यावेळी सरपंच दादाजी सूर्यवंशी, दादाजी मोरे, रमेश रावले, रविकांत सोनवणे, बाळकृष्ण देशमुख, माधव मोरे, रंगनाथ मोरे, एकनाथ देशमुख, केदू भुजाडेल, प्रकाश सोनजे, किरण मालपुरे, युवराज मोरे, हिरामण मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)