ननाशीत जमिनीला हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:42 PM2020-07-10T21:42:45+5:302020-07-11T00:22:24+5:30
ननाशी : ननाशीसह परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या वेळी एका गूढ आवाजाने जमिनीला हादरे बसले़ या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ननाशी : ननाशीसह परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या वेळी एका गूढ आवाजाने जमिनीला हादरे बसले़ या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नाशिक येथील मेरीमधील भूकंपमापक यंत्रावर याबाबतची नोंद झाली असल्याची माहिती दिंडोरीचे प्रांतधिकारी डॉ़ संदीप आहेर यांनी दिली़ दिंडोरी आणि पेठ तालुक्याच्या सीमेवरील ननाशी, जोगमोडीसह परिसरात शुक्रवारी सकाळी अकरा ते सव्वाअकरा वाजेदरम्यान काही मिनिटांसाठी एक मोठा आवाज झाला. या आवाजाबरोबरच जमिनीलादेखील हादरा बसला. सकाळची वेळ असल्याने बहुतांशी नागरिक, महिला घरातच नित्याचे काम करण्यात व्यस्त होते. अचानक झालेल्या या आवाजाने आणि जमीन हादऱ्याने ग्रामस्थांमध्ये काहीशी घबराट निर्माण झाली. काही नागरिकांनी तात्काळ घराबाहेर येऊन परस्परांना हादरा जाणवला की नाही, याबाबत विचारणा केली. दरम्यान हा आवाज नेमका कसला झाला याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. केवळ ननाशीच नव्हे तर परिसरातील अनेक गावांमध्ये असा आवाज आल्याचे आणि हादरा बसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
---------------------
नाशिक वेधशाळेच्या केंद्रात नोंद
ननाशी परिसरात झालेल्या या धक्क्याची नोंद वेधशाळेच्या नाशिक केंद्रात झाली आहे़ याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ननाशी परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी २़८ रिश्टर स्केलची नोंद झाली असून, हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे सांगण्यात आले़ सदर केंद्र नाशिक वेधशाळेपासून ४४ कि़मी़ अंतरावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले, मात्र याबाबत शनिवारी सकाळी अन्य केंद्रांतून प्राप्त होणाºया अहवालानंतरच स्पष्टता होईल़ मागील काळात यासारखे हादरे परिसरातील काही गावांमध्ये जाणवले होते.
-----------------
ननाशी परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून असे धक्के बसत असतात़ जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे याबाबत सर्वेक्षण सुरू आहे़ नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र कच्चा घरात न राहता काळजी घ्यावी़
- प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी