पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:06 AM2020-09-12T02:06:56+5:302020-09-12T02:07:24+5:30
पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे.
नाशिक : पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्याभूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे.
गुरुवारी उत्तर रात्री आणि शुक्रवारी सकाळ या दरम्यान ३.३०, ३.५८ आणि ७.०६ मिनिटांनी सरासरी तीन आणि त्यापेक्षा अधिक तीव्र धक्क्यांची नोंद झाली आहे. पालघर आणि तलासरीच्या टप्प्यात भूकंपाचा केंद्र बिंदू होता अशी माहिती नाशिकच्या मेरी (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) येथील भूकंपमापन केंद्राच्या सूत्रांनी दिली. सध्या पालघर परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. मात्र नाशिकमध्येच भूकंप झाल्याची चर्चा होत असली तरी नाशिकमध्ये मात्र कुठेही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही.
यापूर्वी गेल्या शनिवारी (दि.५) मध्यरात्री नाशिकपासून ९५ किलोमीटर अंतरावर रात्री बारा वाजेच्या सुमारास भूगर्भात हालचाली झाल्याच्या जाणवल्या. त्यामुळे ३.६ रिश्टर स्केलचे धक्के नोंदवले गेले होते. केंद्रबिंदू जमिनीच्या पाच किलोमीटर खाली असल्याचे आढळले होते. पेठ, कळवण तालुक्यातील दळवट या ठिकाणी सौम्य धक्के जाणवत असतात.
त्यामुळे सध्या पालघराला भूकंप झाला की नाशिकला धक्के बसल्याची चर्चा होत असते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.