नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:01 AM2017-12-26T01:01:32+5:302017-12-26T01:02:10+5:30
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे.
नाशिक : कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे. सकाळी ९ वाजून ४४ मिनिटे ३१ सेकंदाच्या दरम्यान जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, साधारणत: पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात त्याचा केंद्रबिंदू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणत: ३.२ रिश्टल स्केलची तीव्रता या धक्क्यांची असल्याने जमिनीला हादरे बसल्याचे तसेच भिंती व दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगण्यात आले. साधारणत: तीन मिनिटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतरही काही कालावधीनंतर दोन धक्के बसले आहेत. त्याची तीव्रता मात्र १.३ व १.६ रिश्टल स्केल इतकी आहे. त्यामुळे फारसे काही जाणवले नाही. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका भूकंपप्रवण म्हणून नोंदविला गेला असून, याठिकाणी अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
२०१८ ची भीती
२०१८ मध्ये भूगर्भात अनेक हालचाली होऊन स्थित्यंतरे होण्याची शक्यता असल्याने आणि त्यामुळे वर्षभरात अनेकदा भूकंपाचे धक्के बसू शकतात अशी शक्यता नासाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात वर्तविली होती. भूकंपाची शक्यता केवळ भूकंपप्रवण क्षेत्रातच होईल असे नव्हे तर पृथ्वीवर त्याचे धक्के जाणवतील असे शास्त्रज्ञांनी म्हटले होते. त्यांच्या या भाकित अनेकांना आठवण झाली. २०१८ उजाडण्यास अद्याप काही दिवसांचा कालावधी असून, सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना २०१८ कडे झुकतानाच भूकंपाची चाहूल लागल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
या भागात नेहमीच बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामागील कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसून, त्यासाठी दिल्ली व हैदराबादच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. आता नाशिक शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर परिसरापर्यंत धक्के जाणवल्याने नाशिककरांच्या पोटात भीतीचा गोळा उठणे साहजिकच असले तरी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे ठिकाण शोधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.