कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:44 AM2020-11-30T00:44:37+5:302020-11-30T00:45:25+5:30
भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे.
कळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे.
शनिवारी रात्री तहसीलदार बी. ए. कापसे व अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. या धक्क्यांमुळे या भागातील आदिवासी बांधवांनी शनिवारची रात्र घराबाहेर जागून काढली.
भूकंपाचे धक्के जाणवू लागताच पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळ, बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे मनोहर ठाकरे, देवळीवणीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण यांनी आमदार नितीन पवार यांना माहिती दिली.
भूकंपप्रवण क्षेत्रात शासनस्तरावरून उपाययोजना करून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
शासनाने भूकंपप्रवण क्षेत्र भागात उपाययोजना करणे गरजेचे असून, परिसर आदिवासी असल्याने शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य जगन साबळे व बिलवाडी, वळीवणी, खिराड, मोहपाडा, पळसदर येथील आदीवासी महिला व बांधवांनी यावेळी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी शासन दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात कायमस्वरुपी भूकंपमापन यंत्र बसून तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील आदिवासी बांधवांची आहे.
भूकंपाचे धक्के, त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोट्यांचा आसरा घेऊन ग्रामस्थांनी रात्र घराबाहेर काढली. शनिवारी रात्री ८.२४, ८.३५, ९.१२, १० वाजता, तर रविवारी सकाळी ७.४७, १०.१०, १०.३०, १०.४५ यावेळेला परिसरात भूकंपाचे धक्के बसले.
आता तरी लक्ष द्या...
बिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भागात भ्रमणध्वनी कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. काही माहिती द्यायची तर बाहेर जाऊन भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.