सुलभ शौचालयास स्थानिकांचाच विरोध

By Admin | Published: November 23, 2015 10:52 PM2015-11-23T22:52:19+5:302015-11-23T22:53:39+5:30

राजीवनगर : राजकारण होत असल्याचा आरोप

Easy toilets opposed locals | सुलभ शौचालयास स्थानिकांचाच विरोध

सुलभ शौचालयास स्थानिकांचाच विरोध

googlenewsNext

इंदिरानगर : येथील राजीवनगर झोपडपट्टी परिसरात सुलभ शौचालय योजना राबविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, स्थानिकांनी मात्र त्यास विरोध दर्शविला आहे. या विरोधामुळे शौचालय बांधण्यासाठीचा मंजूर निधी अद्यापही पडून आहे.
राजीवनगर झोपडपट्टीचा विस्तार पाहाता या ठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यासाठी महापालिकेकडून जागेची निश्चिती करण्यात आली होती. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. परंतु गेल्या सात महिन्यांपासून शौचालय बांधण्यास विरोध होत असल्याने शौचालयाचे काम होऊ शकलेले नाही. काही नागरिकांनी शौचालय बांधण्याचे स्वागत केले होते. परंतु काही राजकीय वरदहस्त असलेले तथाकथित नेते शौचालय बांधण्यास विरोध करीत असल्यामुळे सदर प्रश्न पडून आहे.
राजीवनगर झोपडपट्टी ही खासगी जागेवर वसलेली असल्यामुळे या ठिकाणी मनपाकडून सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून येथील महिलांना उघड्यावरच शौचास जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सोनवणे यांनी याच जागेमध्ये शौचालय बांधण्याची तरतूद करून महापालिकडून निधीही मिळविला. मात्र आता त्यास विरोध होऊ लागला आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी एका खासगी जागेत दहा ते बारा झोपड्या होत्या. नंतरच्या काळात त्यात वाढ होत जाऊन आज सुमारे दीड हजारापेक्षा जास्त लोकसंख्या या झोपडपट्टीत राहात आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने निर्माण झाला आहे. येथील वस्ती ही खासगी जागेत असल्यामुळे पालिकेकडून त्यांना कोणत्याही प्रकारे प्राथमिक सुविधा देऊ शकत नाही. येथील खासगी जागा, शंभर फुटी रस्त्यावर येथील नागरिक शौचास बसत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गाव, परिसर हगणदारीमुक्त झाला पाहिजे यासाठी शासनाकडून व्यापक मोहीम राबविली जाते. परंतु शहरातील झोपडपट्ट्या हगणदारीमुक्त कधी होतील, हा खरा प्रश्न आहे. काही लोक केवळ विरोधाला विरोध करीत असतील तर नागरिकांच्या आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यासाठी सामंजस्याची भूमिका दाखविण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Easy toilets opposed locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.