बाहेरचे पदार्थ खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:21+5:302021-08-14T04:18:21+5:30
नाशिक : दूषित अन्न किंवा दूषित पाण्याने विषमज्वर अर्थात टायफॉइड होतो. त्यामुळे विशेषत्वे पावसाळ्यात बाहेरील पाण्याचा अंश ...
नाशिक : दूषित अन्न किंवा दूषित पाण्याने विषमज्वर अर्थात टायफॉइड होतो. त्यामुळे विशेषत्वे पावसाळ्यात बाहेरील पाण्याचा अंश असलेले पदार्थ टाळणेच सोयीस्कर ठरते. ‘सालमोनेला टायफी’ या जिवाणूचा संसर्ग झाल्याने होणारा विषमज्वर हा एक संक्रामक आजार आहे.
टायफॉइडला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या मात्र वाहक असणाऱ्या व्यक्तीमधूनही हे जिवाणू बाहेर पसरतात. टायफॉइडमधून बरा झालेला रुग्णसुद्धा या जिवाणूचा वाहक असू शकतो. या जिवाणूचा प्रवेश अन्नमार्गात झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा हात स्वच्छ न करणे, अस्वच्छ हातांचा अन्नाशी थेट संपर्क येणे, ही टायफॉइड होण्याची कारणे आहेत.
रुग्णालयांतील टायफाॅइडचे रुग्ण
जून- १५७
जुलै- १७१
ऑगस्ट- ८६
आजाराची लक्षणे
या जिवाणूचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडची लक्षणे दिसण्यास १० ते १४ दिवस लागतात. त्यानंतर अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा येणे, थंडी वाजून ताप येणे, सांधे दुखणे, मळमळणे, उलट्या होणे, पोटात मुरडा होणे, कळ येणे, रक्तमिश्रित जुलाब होणे, छातीवर व पोटावर लालसर पुरळ येणे, ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. टायफॉइडमुळे कधी कधी यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे, रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्राव, सांध्यामध्ये जिवाणूसंसर्ग होणे, आदी परिणाम होऊ शकतात. हृदय, मेंदू आवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा तसेच जिवाचा धोका संभवू शकतो.
ही घ्या काळजी
शौचावर बसलेल्या माशा उघड्या अन्नावर बसून अन्न तसेच पाणी दूषित करतात. त्यामुळेच विशेषत्वे पावसाळ्यात घराबाहेर पाणीपुरी, भेळपुरी असे पाण्याचे पदार्थ आणि ज्यांच्याशी देणाऱ्याच्या हातांचा थेट संबंध येतो, असे पदार्थ टाळणे आवश्यक आहे.
उघड्यावरील खाद्यपदार्थ तसेच ज्यांच्यात पाण्याचा अंश आहेे, असे पदार्थ पावसाळ्यात घराबाहेर न खाणेच केव्हाही योग्य ठरते. तसेच हातांचा थेट संपर्क येणारे किंवा आपल्या नजरेस पडण्यापूर्वी हस्तस्पर्श झालेले पदार्थ टाळण्यावरच भर द्यायला हवा.
----------------------