सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाईचे ग्रहण मिटता मिटेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:54 PM2021-04-08T18:54:57+5:302021-04-09T00:23:37+5:30
श्याम खैरनार सुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ...
श्याम खैरनार
सुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ग्रहण अद्याप संपलेले नाही. ह्यनेमेचि येतो पावसाळाह्ण या उक्तीप्रमाणे दरवर्षी उन्हाची तीव्रता वाढली की, काही गावांमध्ये व पाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागते. या वर्षीदेखील तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
तालुक्यात एकही मोठे धरण नसल्याने, तसेच माफक प्रमाणात पाऊस पडूनही बहुतांश गाव पाड्यांना साधारण फेब्रुवारी अखेरपासून पाण्याची कमतरता जाणवायला सुरुवात होते. गतवर्षी डिसेंबरपर्यंत बेमोसमी पाऊस पडल्याने चालू वर्षी मार्चमध्ये काही गावांमध्ये व पाड्यांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून झरे, नाले आटले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाईस सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत पंचायत समितीकडील पाणीटंचाई विभागाकडे दांडीची बारी, मोरडा, जामनेमाळ या तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींकडून पाठविण्यात आले होते. तेथील सोपस्कार पार पाडून टँकर मंजुरीसाठी सदर प्रस्ताव कळवण येथे उपविभागीय अधिकारी विकास मीना यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. येथून मंजुरी देण्यात आल्यावर तात्काळ टँकर सुरू करून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १४ कामांपैकी अहमदगव्हाण, बन पाडा, बोरगाव, चिखली, हिरड पाडा, मालगव्हाण व कोदरी, रोकड पाडा, साजोळे, उदयपूर व टेटपाडा, वावर पाडा या १० ठिकाणी कामे पूर्ण झाली असून कार्यान्वित आहेत, तर बुबळी, आंबाठा, पळसन, खडकमाळ या ४ ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २ कामे असून, भेगू येथील काम पूर्ण झाले आहे. अलंगुण येथील कामात प्रगती आहे. दरम्यान, खासदार निधीतून सुरगाणा येथील नूतन विद्यामंदिराजवळ पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत भोरमाळ, सावरीचा पाडा, रोकड पाडा, पातळी (खोकरी), उंबर पाडा (खो.), जामुणमाथा (खो.), निंबार पाडा (खो.), उंबरठा गायब (दिगर), उदमाळ, गोंदुणे, सुंदरबन (गोंदुणे), भाटविहीर, कुंभी पाडा, दोडी पाडा, म्हैसखडक, भवानदगड या १६ गावांची कामे प्रगतिपथावर आहेत.
३ टँकरचे प्रस्ताव
१० राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत कामे पूर्ण
४ कामे प्रगतिपथावर
१ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत काम अपूर्ण