विविध शाळांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी
By Admin | Published: October 30, 2016 12:51 AM2016-10-30T00:51:53+5:302016-10-30T00:53:05+5:30
उपक्रम : सामाजिक संस्थांच्या वतीने आदिवासी भागात फराळ, कपडे वाटप
नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने फराळ व कपडे वाटप करण्यात आले.
व्हाईट रोज शाळा
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित व्हाईट रोज इंग्लिश मीडियम स्कूल, सय्यद पिंप्री शाळेत दिवाळी उत्साहात साजरी करून शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेत विद्यार्थ्यांसाठी दिवा सजावट व इको फ्रेण्डली आकाशकंदील बनविण्यासाठी मार्गदर्शन करून स्पर्धा घेण्यात आल्या. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जनजागृती देणारे संदेश दिले. त्यात पर्यावरणाचे संवर्धन करा, प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करा, स्वदेशी वस्तू वापरा, ध्वनिप्रदूषण टाळा, चायना वस्तूंचा वापर टाळा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, गरीब गरजू लोकांसमोर दिवाळी साजरी करा, असे विविध संदेश देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे विभागप्रमुख योगेश रोकडे, मुख्याध्यापक प्रतिभा योगेश रोकडे, भाग्यश्री ढिकले, पद्मजा पाटील, सुविधा खैरनार, हर्षा महाजन, प्रीती संधान, कल्याणी सूर्यवंशी, मुक्ता ढिकले आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अभिनव बालविकास मंदिर
इंदिरानगर परिसरातील म. वि. प्र. संचलित, आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत दिवाळी सण उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी दिवाळीचा फराळ व विविध वस्तूंचे स्टॉल्स लावलेले होते.
या बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन वृषाली गोवर्धने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विष्णुकांत गिते, बापूराव गोवर्धने यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थांना प्रदूषणमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चव्हाण, अनिल जाचक, शरद निकम तसेच भाजपा सिडको अध्यक्ष जगन पाटील, वेणू खंड, वनिता गोसावी, शुक्लेश्वर वर्पे, मुख्याध्यापक राहुल अहिरे आदि उपस्थित होते.
आदर्श मराठी प्राथमिक शाळा
क्रां. व. ना. नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श मराठी प्राथमिक शाळेत दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे सहचिटणीस तानाजी जायभावे, संस्थेचे विश्वस्त दामोदर मानकर, कविता मानकर, प्राचार्य आ. के. टी. उगलमुगले, अनिल सांगळे, विद्या धात्रक, सरला सानप उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सरला सानप यांनी इको फ्रेण्डली दिवाळीच्या आयोजनाची माहिती सांगितली. आरती आव्हाड यांनी दिवाळीची माहिती सांगितली. मनोगतात कु. कोमल भांगे, ऋतुजा सांगळे यांनी दिवाळी कशी साजरी करावी, हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक संदीप सानप यांनी केले.
युथ फॉर युनिटी
येथील नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणारी युथ फॉर युनिटी या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त आदिवासी भागातील विविध पाड्यांवरील आदिवासीबांधव तसेच अनाथ बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना कपडे, फराळाचे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मास्तरवाडी, पहिने, भिलमाळ आदिंसह विविध आदिवासी गावे तसेच पाड्यांवर या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दिवाळीपूर्वीच दीपावलीचा उत्सव साजरा झाल्याने आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. श्रीमती गार्डा अनाथाश्रम आणि जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकराज निराश्रित अनाथ बालगृह येथेही दिवाळीचा फराळ, कपडे, दैनंदिन वस्तू आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनोज टाटिया, लोकेश जैन, वैभव शर्मा, चिराग परमार, अॅड. भूषण टाटिया, रितेश सुराणा, अदिश शाह, प्रतीक जैन, मयूर टाटिया, राहुल सुराणा, प्रणव सोळंके, हरिष कोतकर, प्रतीक लेकुरवाळे, गौरव निकुंभ आदिंसह स्वयंसेवक उपस्थित होते.
स्कॉटिश अकॅडमी हायस्कूलमध्ये लक्ष्मीपूजन
नाशिकरोड येथील स्कॉटिश अकॅडमी हायस्कूलमध्ये दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्युत माळा, दिवे व रांगोळी काढून पणत्या लावून शाळा सजविण्यात आली होती. अध्यक्ष रमादेवी रेड्डी यांच्या हस्ते गणपती व लक्ष्मी या देवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षिक पारंपरिक वेश परिधान करून आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षकांनी दिवाळीच्या पाच सणांची माहिती देऊन दिवाळी साजरी करण्याबाबतचा लक्ष्मीचा जन्मदिवस, विष्णूंकडून रक्षण, नरकासुराचा कृष्णाकडून वध, पांडवांचे परतणे, रामाचा रावणावरील विजय व हिंदूंचे वसुदेव कुटुंबकम सर्व जग एक कुटुंब आहे, असे सांगितले. विविध प्रकारचे गोड पदार्थ, फराळ, फटाके वाटण्यात आले.