इको-फ्रेन्डली अंत्यसंस्कार : वृक्षतोडीवर मोक्षकाष्ठाचा उतारा ठरतोय प्रभावी पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 03:51 PM2020-02-24T15:51:21+5:302020-02-24T16:00:24+5:30
नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक पद्धतीत लाकडांचा किलोने वापर केला जातो. यासाठी वृक्षतोड करावी लागत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत ...
नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक पद्धतीत लाकडांचा किलोने वापर केला जातो. यासाठी वृक्षतोड करावी लागत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यावर पर्याय म्हणून नागपूर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेकडूनही पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा पर्याय विचारात घेतला जात आहे. दरम्यान, एका बेवारस मृतदेहावर अमरधाममध्ये पर्यावरणप्रेमींच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक पद्धतीने सोमवारी (दि.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील वर्षापासून नाशिक शहरात इको-फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शेतातील कचऱ्याच्या माध्यमातून तयार केलेल्या ठोकळ्यांचा (ब्रिकेट्स) वापर करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयोग दोन वर्षांपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. २०१८ साली दोन मृतदेहांवर तर मागील वर्षी एका मृतदेहावर अशाच पद्धतीने अंत्यसंस्कार करत शेकडो टन लाकूड वाचविण्यात यश आले. पर्यायाने वृक्षतोडीचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होत आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी किमात तीनशे ते साडेतीनशे किलो इतके लाकूड लागते. त्याऐवजी शेतकचºयापासून बनवलेले ठोकळे केवळ अडीचशे किलो इतकेच लागतात. हे ठोकळे शेतीमधून निघणाºया कचºयापासून तयार केले जातात. या पर्यायाला अधिकाधिक प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदेचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरणप्रेमी आकांक्षा नाईक यांनी यावेळी सांगितले. अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच आहे, मात्र या पद्धतीत इंधनाचा पर्याय नवा वापरला गेला आहे. हा पर्याय जर मनपाने उपलब्ध करून दिला तर मोठ्या प्रमाणात वृक्षराजीचे जतन करण्यास यश येईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
मनपाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा
दोन वर्षांपाून इको फ्रेन्डली लिव्हिंग फाउंडेशनसह स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून महापालिका प्रशासनाकडे मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत दहनासाठी शेतकच-यापासून तयार केलेल्या ठोकळ्यांच्या वापरास प्राधान्य द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही. मनपा प्रशासनाने उदासीनता दूर करून मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठ्याची नवीन निविदा काढताना तरी या पर्यायाचा विचार करायला हवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांकडून होत आहे.