पर्यावरणपूरक संस्था सज्ज
By admin | Published: September 15, 2016 12:45 AM2016-09-15T00:45:50+5:302016-09-15T00:57:01+5:30
मिशन गणेशमूर्ती संकलन : महापालिके सह, पर्यावरणप्रेमी देणार योगदान
नाशिक : दरवर्षी नाशिककर पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करत निसर्गाचे संवर्धन करण्यास हातभार लावतात. लाखो मूर्तींचे महापालिका संकलन करते. यासाठी पालिकेसह शहरातील सर्वच संस्था पुढाकार घेत सज्ज झाल्या आहेत. ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंदे्र उभारून निर्माल्य व मूर्ती संकलनाची ‘मिशन’ राबविणार आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही महापालिकेने शहरात विभागनिहाय कृत्रिम तलावांसह कृत्रिम कुंडही उभारले आहेत. बहुतांश ठिकाणी विसर्जन केंद्र आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनीदेखील मूर्ती संकलन केंद्र थाटले असून, मूर्ती संकलनाची भूमिका पार पाडून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पिण्याच्या किंवा वापराच्या जलसाठ्यात म्हणजेच विहिरी व नदींमध्ये कोणत्याही कारणाने प्रदूषण होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक भान राखून नैसर्गिक जलस्त्रोत टिकविण्याची जबाबदारी पार पाडत गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन करणे टाळावे, घरच्या घरी बादलीभर पाण्यात मूर्ती विसर्जित करून सदर मूर्ती समाजसेवी, पर्यावरणपूरक संस्थांच्या केंद्रांवर दान करत पर्यावरणपरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विविध पर्यावरणप्रेमी, समाजसेवी संस्थांनी केले आहे.
त्याचप्रमाणे निर्माल्यदेखील नदीपात्राच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहमध्ये सोडू नये त्याऐवजी बागेमध्ये खड्डा करून टाकावे, जेणेकरून निर्माल्याचे कालांतराने खतामध्ये रूपांतर होऊन झाडांना पोषक ठरेल किंवा संकलन वाहनांमध्ये निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)