पंचवटीत भाविकांची आर्थिक लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:07 AM2018-11-13T00:07:52+5:302018-11-13T00:08:29+5:30
दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू-मैं मैं होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणीनागरिकांनी केली आहे.
पंचवटी : दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू-मैं मैं होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणीनागरिकांनी केली आहे. पंचवटीत राममंदिर, सीतागुंफा, तपोवन, गंगाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात परराज्यातील भाविक येत असतात. दर्शनासाठी येणारे भाविक आपली चारचाकी वाहने गंगाघाटावरील वाहनतळावर उभी करतात व तेथून पुढे रिक्षाने पंचवटीचे दर्शन करतात. भाविकांना काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड, काट्या मारुती, लंबा हनुमान, तपोवन आदींसह अन्य मंदिरांतील देवदेवतांचे दर्शन रिक्षाचालक घडवितात. सदर रिक्षाचालक रिक्षात ७ ते ८ प्रवासी बसवून प्रत्येक प्रवाशाकडून किमान शंभर रु पये याप्रमाणे ७०० ते ८०० रुपये याप्रमाणे भाडे आकारत असल्याची चर्चा आहे. पंचवटी दर्शन घडविताना रिक्षाचालक भाविकांना मंदिराची संपूर्ण माहिती देत नाही शिवाय मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना लगेच परत येण्याचा आग्रह धरतात तर काही रिक्षाचालक मंदिराला प्रदक्षिणा मारू न देता भाविकांना रिक्षात बसण्याची घाई करतात. त्यामुळे रिक्षाचालक आणि भाविकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होतात. वाद झाल्यानंतर काही रिक्षाचालक तर सदर भाविकांना अर्ध्या रस्त्यातच उतरवून देण्याची धमकी देतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांत अनेकदा असे गैरप्रकार घडत असल्याने नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रिक्षाचालकांवर कारवाई नाही
पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंचवटी दर्शनाची सफर घडविताना रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. त्यातून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे गंगाघाटावर रोजच वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली रिक्षाचालक करीत असले तरी त्यांच्यावर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग कोणतीही दंडात्मक कारवाई करत नाही.