शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By admin | Published: December 3, 2015 09:49 PM2015-12-03T21:49:01+5:302015-12-03T21:50:42+5:30

खरिपाचे नुकसान : कांदा भिजून खराब झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’

The economics of farmers collapsed | शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Next

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने तीन-चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरिपाचे नुकसान रब्बीने भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. खरे तर खरिपाच्या प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आणि आता शेतकऱ्यांची खरी परीक्षा निसर्गाचा लहरीपणा पाहत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे हाताशी आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडी होती. त्यामुळे भूगर्भातील जलाशयाच्या पातळीत पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नव्हती. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने बी-बियाणे खर्च करत खरिपाची जणू परीक्षा दिली. उत्पादन किती निघते यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. कर्जाचा डोंगर मात्र सरेल अशी आशा वाटत नसल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी दिवाळीआधी खरीप पिकांची काढणी होत असे. तसेच दिवाळीअगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा विकला जात असे. दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येत असल्याने तेवढाच दिलासा मिळत होता. परंतु चालू वर्षी पावसाअभावी उशिरा लागवड झाल्याने दिवाळीनंतर लाल कांदा तयार झाला. जो काही काढून तयार केला होता, तो या बेमोसमी पावसाने पूर्णपणे भिजून गेल्याने खराब झाला. शेतातील काढणीस आलेला कांदा शेतातच सडू लागल्याने हा कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव फारच कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघतो की नाही याची चिंता बळीराजाला पडली आहे.
देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा होत्या. या अल्पशा पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाने शेतकऱ्याला भरपूर पैसा व सुबत्ता दिली होती. परंतु डाळींबबागांवर तेल्या रोगाने थैमान घातल्याने चार-पाच वर्षे या बागांवर अतिरिक्त पैसा खर्च झाल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला होता. शेवटी नाइलाजाने डाळिंबाच्या बागा उपटून फेकण्यात आल्या. उत्पादन खर्चही न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांकडे खरिपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळीनंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसाने लागवडीस आलेली व नाजूक अवस्थेत असलेली रोपे पावसाने झोडपली गेली. त्यामुळे ही रोपे आता पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चालू वर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी उशिरा झाली. पर्यायाने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाली. शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी पावसामुळे भिजून खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याची टंचाई आतापासूनच भासू लागली आहे. आता पुढील नियोजन कसे करावे याची चिंता शेतकऱ्याला सतावते आहे.
आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी
मालेगाव तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत देऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश कॉँग्रेस कार्यकारिणी सदस्य डॉ. तुषार शेवाळे, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या सह्या आहेत.
मालेगावी थंडीच्या दिवसात उकाडा
गिसाका : मालेगाव शहर परिसरात यंदा नागरिकांना भर हिवाळ्यात उन्हाचा सामना करावा लागत असून, गुलाबी थंडीऐवजी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे लोकांनी गेल्यावर्षी कपाटात बंद करून ठेवलेले उबदार कपडे अद्याप बाहेर काढलेले नाहीत. दरवर्षी नोेव्हेंबर महिन्यातच थंडीचा सामना करावा लागत असतो. (वार्ताहर)

Web Title: The economics of farmers collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.