ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

By admin | Published: November 12, 2016 10:47 PM2016-11-12T22:47:57+5:302016-11-12T22:47:28+5:30

बाजारपेठा थंडावल्या : ५००, १००० च्या नोटा बंद झाल्याचा परिणाम

Economics jam in rural areas | ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

Next

 कळवण : ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा परिणाम शहरातील बुधवारच्या आठवडे बाजारात दिसून आला. त्यानंतर गुरुवार , शुक्र वार व शनिवारीदेखील कळवण, अभोणा व कनाशी येथील बाजारपेठेतही स्थिती जैसे थी होती. व्यापारी व व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांनी दर्शनी भागावरच ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे फलक लावल्याने ग्राहकांची मोठी कोंडी झाली होती. सुट्टे पैसे घेऊन या असे फर्मान दुकानदारांकडून सोडले जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक व दुकानदार असलेला व्यापारी मोदी सरकारच्या निर्णयामुळे चांगलाच मेटाकुटीस आला आहे.
उधारीत घेऊन जा, पण ५०० व १००० रु पयांची नोट नको. भले पैसे देऊ नका उधारीत घेऊन जा, अशी सामाजिक बांधिलकी ग्रामीण व आदिवासी भागात यातून दिसून येत आहे. कळवण शहरात काही टक्केवारीच्या अपेक्षेने व्यावसायिक छोट्या व्यावसायिकांना आमिष दाखवून उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कळवण शहरातील मेनरोड व व्यापारी पेठेत नेहमी वर्दळ असते. मात्र आज या उलट चित्र मेनरोड व बाजारपेठेत दिसून आले. मेनरोड व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असल्याने त्याचा व्यवहारावर परिणाम झाला आहे.
गेल्या मंगळवारी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला सोसावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुक्रवारपासून नवीन नोटा चलनात आल्या असून, एटीएम सुरू होणार असल्याने शुक्र वारी व शनिवारी मोठ्या अपेक्षेने ग्रामीण भागातील नागरिक कळवण शहरात आले होते. मात्र शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या दरवाजाला आतील गर्दीमुळे कुलूप, त्याच्यासमोर लांबच लांब लागलेल्या रांगा दिसून आल्या. शिवाय पॅनकार्ड नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले. एकंदरीत जुन्या नोटा बंद झाल्याने तसेच नव्या नोटा चलनात आल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प झाल्याचे दिसून आले.
पतसंस्थाचा नकार
रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बँक, बॅँक आॅफ महाराष्ट्र, बॅँक आॅफ इंडिया, दी कळवण मर्चण्ट बॅँक, नामको बॅँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक शाखांचे कळवण शहरात दैनंदिन कामकाज चालू असून, बॅँक व शाखांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा स्वीकार करण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकानी पतसंस्थाबाबत असहकाराची भूमिका घेतल्याने ५०० व १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा पवित्रा शहरातील नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची व पतसंस्थेच्या खातेदार व ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांनी नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाशी असहकार पुकारल्याने त्याचा परिणाम पतसंस्थेच्या कारभारावर व व्यवहारावर होत असून खातेदार व ग्राहकांची अडवणूक होत असल्याने शासनाने यासंदर्भात पतसंस्थाना सहकार्य होईल असे निर्देश राष्ट्रीयीकृत बॅँकाना द्यावे, अशी मागणी डॉ. दौलतराव अहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार यांनी केली
आहे. याबाबत कळवण तालुक्यातील पतसंस्थाना राष्ट्रीयीकृत बॅँकानी चलन उपलब्ध करून द्यावे तसे न झाल्यास शहरातील नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कारभारावर परिणाम होणार असल्याने पतसंस्था बंद ठेवण्याचा इशारा स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Economics jam in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.