‘वसाका’वर अवसायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:56 AM2018-12-21T01:56:59+5:302018-12-21T01:57:15+5:30
सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी पदभार स्वीकारला.
लोहोणेर : सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी पदभार स्वीकारला.
गेली तीन-चार वर्षे बंद असलेला वसाका आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आला; मात्र कर्जाच्या डोंगराखाली असल्याने व बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने वसाका चालविणे एक आव्हान ठरले होते. त्यामुळे आमदार आहेर यांच्या नेतृत्वाखालील प्राधिकृत मंडळाने वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. त्यास विशेष सभेमध्ये सभासद व कामगारांनी सहमती दर्शविली. त्यानुसार वसाका डी.व्ही.पी. ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास आॅक्टोबर महिन्यात भाडेतत्त्वावर देण्यात आला.
दरम्यान, वसाकावर कामकाज पाहत असलेल्या प्राधिकृत मंडळाची मुदत संपत आल्याने दोन वेळेस मुदतवाढही देण्यात आली. (पान ७ वर)
परंतु तिसऱ्या वेळेस मुदतवाढ देणे शक्य नसल्याने अखेर अहमदनगरच्या प्रादेशिक उपसंचालकांनी कलम १०३ (१) नुसार अवसायक म्हणून विशेष लेखा परीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्या उपरोक्त आदेशानुसार दि. १९ रोजी वसाका कार्यस्थळावर येऊन राजेंद्र देशमुख यांनी कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी धाराशिव कारखान्याचे संचालक संतोष कांबळे व खरात यांनी देशमुख यांचा सत्कार केला. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय पाटील, मनोहर जावळे, भाऊसाहेब देशमुख, रवींद्र सावळे, पवार आदींसह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.