अर्थव्यवस्थेचा गाडा पंक्चर चाकांमुळे अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:25 AM2018-07-08T00:25:44+5:302018-07-08T00:28:51+5:30

नाशिक : गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्चवगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

Economy car stops due to puncture wheels | अर्थव्यवस्थेचा गाडा पंक्चर चाकांमुळे अडला

अर्थव्यवस्थेचा गाडा पंक्चर चाकांमुळे अडला

googlenewsNext
ठळक मुद्देकॉँग्रेसमुक्तीचा लाभ कोणाला ?स्वातंत्र्याचा संकोच होतोय :

नाशिक : गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्चवगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.
महाराष्टÑ प्रदेश कॉँग्रेस समितीतर्फे ‘आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक, रोजगाराचा अभाव’ या विषयावर शनिवारी येथील चोपडा लॉन्समध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून चिदंबरम बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार कुमार केतकर आणि माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे उपस्थित होते.
अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी होणारी गुंतवणूक महत्त्वाची असते. गुंतवणुकीमधून रोजगाराची निर्मिती होते. त्यापासून उत्पन्न मिळते आणि भांडवलाची निर्मिती होते. भांडवल निर्मितीमुळे पुन्हा गुंतवणूक होते. हे चक्र कायम राहिल्यास अर्थव्यवस्था वेग घेते; मात्र नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या दोन बाबींनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असल्याचे चिदंबरम म्हणाले. नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे अर्थव्यवस्थेमधील गुंतवणुकीचा दर कमी झाला आहे तसेच रोजगार निर्मिती पूर्णत: ठप्प झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलणे सर्वसामान्यांच्या हातात असल्याचे सांगून त्यासाठी आगामी निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जीएसटीची मूळ कल्पना कॉँग्रेसची होती. त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपाने याला विरोध केला; मात्र त्यानंतर सत्तेवर येताच त्यांनी जीएसटीची तोडमोड करीत तो लागू केला. जगभरातील ज्या देशांमध्ये जीएसटी लागू आहे, तेथे त्याचा एकच दर आहे; मात्र भारतात त्यासाठी आठ दर आहेत. काळा पैसा बाहेर येण्याची व भ्रष्टाचार संपण्याची नोटाबंदीची जी उद्दिष्टे सांगितली गेली ती पूर्ण झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सध्या देशामध्ये सर्वत्र दहशतीचे वातावरण असून, कोणाला काहीही बोलू दिले जात नसल्याचे सांगितले. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे. देशात सर्वत्र शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. एकट्या महाराष्टÑात वर्षभरामध्ये १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, हे गंभीर आहे. भाजपा सरकारच्या काळामध्ये देशात ६५ टक्के नोकºया कमी झाल्याचेही चव्हाण म्हणाले.
मोदी सरकारकडून अनेक संवैधानिक संस्था बंद करण्यात येत असल्याबद्दल खासदार कुमार केतकर यांनी टीका केली. नियोजन आयोग रद्द करून त्याजागी निती आयोग आणला तो केवळ नेहरूंना विरोध म्हणून; मात्र नियोजन आयोगाची मूळ कल्पना १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस आणि राम मनोहर लोहिया यांनी मांडली होती, त्याचाच त्यांना विसर पडलेला दिसून येतो, असेही ते म्हणाले.
चर्चासत्राचा प्रारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार तुषार शेवाळे यांनी मानले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. हेमलता पाटील यांनी केले. राष्टÑगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कॉँग्रेसमुक्तीचा लाभ कोणाला ?
काही साम्राज्यवादी देशांकडून भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याचे खासदार कुमार केतकर यांनी सांगितले. काश्मीरबाबत सध्याचे धोरण राबविले गेल्यास तेथे अराजक येण्याची व त्यातूनच काश्मीर भारतापासून वेगळा होण्याची भीती व्यक्त करून कॉँग्रेसमुक्त भारताचा फायदा अमेरिकेसह विविध साम्राज्यवादी देशांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणाचे काय होणार यापेक्षा देशाचे भवितव्य काय राहणार हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचेही केतकर म्हणाले.
चिदंबरम यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
* गुंतवणुकीमधूनच विकास आणि रोजगार निर्मिती शक्य
* गेल्या चार वर्षांमध्ये बॅँकांचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला
* मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये विकास दर, निर्यातीमध्ये मोठी घट झाली
* नवीन नोकºयांची निर्मिती नाही. केवळ रिक्त जागा भरल्या जातात
* जीएसटीमुळे रिटर्नची संख्या वाढली. रिटर्नमध्ये सुधारणेची संधी नसल्याने रिफंडची रक्कम अडकली
* चांगला सल्ला देणारे सरकारला नकोत
नाशिकची माहिती देशातील कोणताही अर्थमंत्री नाशिकला विसरू शकत नसल्याचे पी. चिदंबरम यांनी भाषणाच्या प्रारंभीच सांगितले. सरकार चालविण्यासाठी अर्थमंत्र्यांना पैसा लागतो आणि नाशिकमध्ये नोटा छापण्याचा कारखाना असल्याने ते प्रत्येक अर्थमंत्र्याला माहितीच असते. गोदावरी नदी आणि कुंभमेळ्यामुळेही नाशिकची ओळख सर्वत्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हुंडी मोजणाºयांना बोलवा
नोटाबंदीनंतर बॅँकांमध्ये किती नोटा जमा झाल्या ते अद्यापही जाहीर झाले नाही. याबाबत विचारले असता रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरसह सर्वच जण अजून मोजणी सुरूच असल्याचे सांगतात. तिरुपतीच्या बालाजी मंदिरामध्ये येणाºया देणग्यांसाठी एक प्रचंड मोठी हुंडी ठेवलेली आहे. रोज सकाळी ११ वाजता ती रिकामी केली जाते आणि अवघ्या काही तासांमध्ये त्यामध्ये जमा झालेली रक्कम मोजून ती किती आहे ते जाहीर केले जाते. या हुंडी मोजणाºयांना आता नोटा मोजण्यासाठी बोलवा, असा सल्लाही चिदंबरम यांनी दिला.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ माझा?
मागील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ माझा? अशा जाहिराती केल्या होत्या. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये राज्याची कोणतीही प्रगती झालेली नाही. आंतरराष्टÑीय बाजारामध्ये खनिज तेलाचे दर कमी झाले असतानाही महाराष्टÑामध्ये मात्र पेट्रोल-डिझेल हे सर्वाधिक महाग आहे. त्यामुळे आता आम्हीही सत्ताधाºयांना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ माझा? असे विचारावे का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
स्वातंत्र्याचा संकोच होतोय :
सध्या देशामध्ये उन्मादक सांस्कृतिक राष्टÑवाद फैलावत आहे. यामधून न्यायसंस्थेसह विविध संवैधानिक संस्थांच्या स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी सांगितले. खोट्या इतिहासाचे उदात्तीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. देशामध्ये अघोषित सेन्सॉरशिप असल्याचे सांगत देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Economy car stops due to puncture wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.