दिवाळीपूर्वी खाद्यतेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:28 AM2021-10-15T01:28:41+5:302021-10-15T01:31:01+5:30
केंद्र शासनाने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने बाजारात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये १५ ते २० रुपयांनी घट आल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या असून त्यामुळे यंदाच्या दिवाळीत खाद्यतेलाचे दर किमान दीडशेच्या आत राहणार असल्याने नागरिकांना दिवाळीत अल्पसा तरी दिलासा मिळू शकणार आहे.
नाशिक : केंद्र शासनाने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने बाजारात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये १५ ते २० रुपयांनी घट आल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या असून त्यामुळे यंदाच्या दिवाळीत खाद्यतेलाचे दर किमान दीडशेच्या आत राहणार असल्याने नागरिकांना दिवाळीत अल्पसा तरी दिलासा मिळू शकणार आहे.
केंद्र शासनाने गत महिन्यात ११ सप्टेंबरला पामतेल, सोयातेल आणि सुर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी केले आहे. पामतेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी करून २.५ टक्के करण्यात आले आहे. कच्चे सोया आणि कच्च्या सुर्यफूल तेलावरील आयात कर देखील ७.५ टक्क्यांनी कपात करून २.५ टक्के करण्यात आला आहे. या कपातीमुळे बाजारावर परिणाम होत असून महागाईचा भडका अल्पसा कमी होण्यास मदत होणार आहे, तसेच देशात उत्पादित होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती वेगवेगळ्या उपाययोजनांनी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. शासनाने घेतलेला हा शुल्क कपातीचा निर्णय ३१ मार्चपर्यंत कायम ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील सहा महिने तेलाच्या दरात काहीसा दिलासा कायम राहणार आहे.
इन्फो
साठ्याबाबत विवरण
सरकारकडून खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमध्ये घट आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. होलसेल विक्रेते, मिल मालक आणि रिफायनरींना आपल्या साठ्याविषयीचे विवरण एका वेब पोर्टलवर रोज उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्व तेलाच्या दुकानांमध्ये दर कमी होणे निश्चित आहे.
तेलाच्या दरात झालेली कपात अगदीच थोडी आहे. त्यात अजून वाढ केली तरच सामान्य नागरिकांची दिवाळी अधिक आनंदात जाऊ शकेल. त्यामुळे दरात अजून काही कपात करता आली तर शासनाने करावी.
सुषमा दाणी, गृहिणी
तेलाचे दर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी तेलाचे दर किमान शंभर रुपयापर्यंत खाली आले तरच तेलाची महागाई कमी झाली असे म्हणता येईल. त्यामुळे अजून दर कमी करण्याची गरज आहे.
दुर्गा कुलकर्णी, गृहिणी.
---------------------
केंद्र शासनाने तेलावरील आयात शुल्क कमी केल्याने गत दोन दिवसांत तेलाच्या भावात १२० ते १५० रुपये प्रति लीटर भाव खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना लीटरमागे १० ते १५ रुपये दिलासा मिळणार आहे.
अनिल बुब, होलसेल किराणा व्यापारी.