खाद्यतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी उतरले; आता खा चमचमीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:09+5:302021-06-19T04:11:09+5:30
मागील वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन एक किलो तेलासाठी १८० ते १८५ रुपये मोजावे लागत होते. केंद्र ...
मागील वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन एक किलो तेलासाठी १८० ते १८५ रुपये मोजावे लागत होते. केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केल्याने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर उतरले आहेत. जवळपास वर्षभरानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने पुढील हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याचा अंदाज वर्तविला जात असून त्याचाही परिणाम दर खाली येण्यावर झाला आहे.
चौकट-
खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
तेल आधीचे आताचे
सूर्यफूल १८० १७०
सोयाबीन १५५ १३५
शेंगदाणा १८० १७०
पाम १४० १३०
चौकट -
शेतकऱ्याच्या घरातही विकतचे तेल
कोट-
पूर्वी आमच्या शेतात करडई , भुईमूग चांगला होत असे. शिवाय गावात तेलाचा घाणाही होता किंवा किराणा दुकानदाराला विशिष्ट वजनाचे शेंगदाणे किंवा करडई दिली तरी त्याबदल्यात तो तेल देत असे किंवा घाण्यावर करडई घेऊन गेले तरी तेल काढून मिळायचे. ते परवडणारे होते. आता दिवसमान पालटले आहेत. गावांमधील तेलाचे घाणेही कमी झाले असून पिकेही हवी तशी येत नसल्याने आम्हाला आता विकतचेच तेल खावे लागते.
- अशोक दौंडे, शेतकरी
कोट-
आमच्या भागात खुरसणी चांगली पिकायची. त्यामुळे आम्ही त्याचेच तेल वापरत असून आता पावसाचे प्रमाणही कमी झाले असून पहिल्यासारखी कुणी जास्त खुरसणी करतही नाही. यामुळे आता विकतचे तयार तेल घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. दुकानदाराला खुरसणी दिली तरी तो तेल देत असे. आता ती पध्दतही बंद झाली आहे.
- यशवंत गावंडे, शेतकरी