महाविकास आघाडीच्या हाराकिरीने शिक्षण समिती पुन्हा भाजपकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:16+5:302021-03-06T04:14:16+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला सहजासहजी विजयी होऊ न देण्याचा चंग ...
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या दहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला सहजासहजी विजयी होऊ न देण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्याआधीच होत असलेल्या शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपचे बहुमत असतानाही अशाच प्रकारे सहज निवड होऊ न देण्यासाठी शिवसेनेने तयारी केली होती. सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल कल्याण समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी भाजपच्या संगीता गायकवाड आणि शिवसेनेच्या ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केले होते. नऊ सदस्य असलेल्या या समितीत भाजपचे पाच सदस्य हजर होते. मात्र, स्वत: खोले ऐनवेळी धावपळ करीत आल्या. तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. माघारीसाठी पंधरा मिनिटे झाल्यानंतर ज्योती खोले आल्याने निवडणूक अटळ झाली. परंतु विरोधकांची चार मतेही इंटॅक्ट नव्हती. या समितीतील शिवसेनेच्या सदस्या किरण गामणे आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले हे गैरहजर होते, तर शिवसेनेचे सुनील गोडसे उपस्थित असले तरी मुळात ते स्वीकृत सदस्य असल्याने त्यांना मताधिकारच नव्हता. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. या निवडणुकीत गायकवाड यांना भाजपची पाच मते मिळाली. परंतु खोले यांना एकमेव स्वत:चे मत मिळाले आणि पराभव पत्करावा लागला.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शाहीन मिर्झा आणि सेनेच्या ज्योती खोले यांचेच अर्ज होते. मात्र, सभापतीपदाच्या निवडणुकीतील एकंदर स्थिती बघता त्यांनी माघार घेणे पसंत केले आणि उपसभापतीपदी मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी नगर सचिव राजू कुटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले, तर बैठकीत भाजपचे शिवाजी गांगुर्डे, हेमलता कांडेकर देखील उपस्थित होते.
इन्फेा...
भाजपने गांभीर्याने घेतली निवडणूक
शिक्षण समिती तशी स्थायी समितीच्या तुलनेत किरकोळ असली तरी भाजपने खूप गांभीर्याने घेतली. गटनेते जगदीश पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावले. त्या तुलनेत शिवसेनेने गांभीर्याने घेतले नाही. या पक्षाचे पदाधिकारी फिरकले नाहीत. परंतु ज्यांना उमेदवारी दिली, त्या उमेदवारदेखील माघारीनंतर परतल्या. ज्याेती खोले या स्थायी समितीच्या सदस्य असून, सध्या सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्व त्या पक्षाच्या वतीने सहलीवर मानस हॉटेलात मुक्कामी आहेत. तेथून येण्यास वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले.
कोट...
गेल्यावेळीसुध्दा सभापतीपद मिळाले होते. मात्र, कोरोना काळात अनेक कामे करता आली नाहीत. पक्षाने पुन्हा संधी दिल्याने आता शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच धाेरणात्मक निर्णय घेता येतील.
- संगीता गायकवाड, सभापती, शिक्षण समिती