शिक्षणखात्याची उदासीनता

By admin | Published: June 21, 2017 01:18 AM2017-06-21T01:18:22+5:302017-06-21T01:18:43+5:30

शिक्षक वेतनाचा प्रश्न : सहा दिवसांनंतर अधिकाऱ्यांना आली जाग

Education Depression | शिक्षणखात्याची उदासीनता

शिक्षणखात्याची उदासीनता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षणखात्याची उदासीनता आणि वेळकाढू भूमिकेमुळे जिल्ह्यातील सुमारे १६ हजार शिक्षक अद्यापही वेतनापासून वंचितच आहेत. या शिक्षकांचे बॅँक खाते उघडण्याची प्रक्रिया लांबविण्यात आल्यामुळे वेतनाचे पैसे येऊनही शिक्षकांच्या खात्यात छदामही जमा होऊ शकलेला नाही. शासनाने आयडीबीआय बॅँकेतून वेतन देण्याचे आदेश काढल्यानंतरही शिक्षण विभागाला बॅँक खाते उघडण्यास तब्बल सहा दिवसांचा विलंब झाला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा बॅँकेतून वेतन मिळाले नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाल्याने अखेर शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले होते. गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक संघटना वेतनासाठी संघर्ष करीत आहेत. वेतनाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या शिक्षकांनी अनेकविध मार्गाने आंदोलन केले, प्रसंगी त्यांच्यावर केसेसही झालेल्या आहेत. असे असतानाही शिक्षण विभागाला शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव झालेली दिसत नसल्याचा गंभीर आरोप शिक्षक संघटना करीत आहेत.
जिल्हा बॅँकेऐवजी सरकारी बॅँकेतून शिक्षकांचे वेतन व्हावे यासाठी शिक्षकांनी आंदोलन छेडले होते, काही संघटनांचे प्रतिनिधी न्यायालयातही गेले होते. मात्र शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा बॅँकेऐवजी आयडीबीआय या खासगी बॅँकेतून वेतन अदा केले जाईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार गेल्या १४ रोजी शासनाने तसे आदेशही काढले आहेत. मात्र आदेश निघून सहा दिवसांचा कालावधी लोटला असतानाही शिक्षण विभागाकडून खाते उघडण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. उशिराने जागे झालेल्या शिक्षण विभागाने आता बॅँक खाते उघडण्याबाबतची कार्यशाळा आयोजित केली असून, दि. २१ रोजी माध्यमिक आणि २२ रोजी प्राथमिक शिक्षकांचे बॅँकेत खाते उघडण्याबाबत रावसाहेब थोरात सभागृहात सभा आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे हे दोन दिवसही वाया जाणार असून २३ तारखेपासून खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यातही ही मोठी आणि क्लिष्ट प्रक्रिया करण्यात असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होणार केव्हा आणि वेतन कधी होणार असा संतप्त सवाल शिक्षकवर्गाने उपस्थित केला आहे.
वास्तविक शासानाचे आदेश आल्यानंतर शिक्षण खात्याने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन बॅँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. खरे तर बॅँक खात्याबाबत १९ रोजीच बैठक आयोजित करण्यात येणे अपेक्षित होते. परंतु विभागाच्या वेळकाढू भूमिकेमुळे ही कार्यशाळा आता २१ आणि २२ रोजी होत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर प्रक्रिया ही कोणत्याही परिस्थितीत ५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात आली तर शिक्षकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे मिळू शकेल अशी अपेक्षा शिक्षक वर्गाकडून व्यक्त होत आहे.
वास्तविक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक शाळेची माहिती आॅनलाइन भरण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देत आहेत, इतर शासकीय कामेदेखील शिक्षक करीत असताना शिक्षकांच्या खाते उघडण्याला इतका विलंब होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून, शिक्षण खात्यानेही रात्रंदिवस कामे करून शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी तत्परता दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Education Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.