Education: एकाच पुस्तकात सर्व विषयांचा समावेश, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले सूतोवाच
By Sandeep.bhalerao | Published: July 30, 2023 04:55 PM2023-07-30T16:55:45+5:302023-07-30T16:56:08+5:30
Deepak Kesarkar: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तर कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने समाविष्ट केल्याच्या प्रयोगानंतर आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आणखी एक अभिनव संकल्पना मांडली आहे.
नाशिक - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तर कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांमध्येच वह्यांची पाने समाविष्ट केल्याच्या प्रयोगानंतर आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आणखी एक अभिनव संकल्पना मांडली आहे. आता सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याचे केसकर म्हणाले.
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.३०) शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी माहिती दिली. नाशिक विभागाचे अध्यक्ष नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील व नाशिक विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण संस्थांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागात सुरू असलेल्या बदलांबाबत शासन सकारात्मक असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आनंदाने घेता यावे यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने दफ्तराचे ओझे कमी करण्यावर भर देण्यात येणार असून एकाच पुस्तकातून सगळे विषय शिकविण्याबाबतचा प्रयोग महाराष्ट्रात राबवायचा असून यामध्ये शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या.