पोलिसांना ‘ई-अकॅडमी’द्वारे शिक्षण : बजाज
By admin | Published: January 15, 2015 12:12 AM2015-01-15T00:12:51+5:302015-01-15T00:14:23+5:30
पोलिसांना ‘ई-अकॅडमी’द्वारे शिक्षण : बजाज
नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीत ई-अकॅडमी सुरू करण्यात येणार असून, त्याबाबचा प्रस्तावही वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे़ या उपक्रमामुळे राज्यातील विविध स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांना पोलिसांसंबंधी विविध विषयांची माहिती व प्रशिक्षण संगणकाद्वारे देणे शक्य होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली़ अकादमीद्वारे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़
बजाज पुढे म्हणाले की, ई-अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना आॅनलाइन शिक्षण देता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, विविध विषयांसंदर्भात माहिती व कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ पोलीस अधिकाऱ्यांसाठी वर्षातून सहा दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक असून, ते या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे़ त्यासाठी येत्या काही महिन्यांत अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे़ या अकादमीच्या माध्यमातून त्याला आवश्यक असलेले प्रशिक्षण व विविध विषयांची माहिती ई-मेलच्या माध्यमातून दिली जाईल. याचा फायदा प्रत्येक अधिकाऱ्याला अपडेट राहण्यासाठी होईल़ तसेच कायद्यातील विविध पुस्तकांचे भाषांतर करून ही पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत़
अकादमीत नवीन पोलीस अधिकाऱ्यांना मूलभूत व राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाते़ मूलभूत प्रशिक्षणामध्ये आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणाचा अंतर्भाव असून, यामध्ये कायदा, पोलीस मॅन्युअल, गुन्हे तपासासंबंधी विषयांचा समावेश आहे, तर बाह्य वर्गात शारीरिक प्रशिक्षण आहे़ पोलिसांसमोरील सद्यस्थितीची आव्हाने पाहता प्रशिक्षणार्थींना पोलीस ठाणे व्यवस्थापन, मानवी वर्तणूक, पोलीस संरचना, संगणक, सायबर क्राईम या विषयांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे़ तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्ती त्यांना येऊन मार्गदर्शन करतात़
अकादमीत प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते, तसेच प्रिव्हेटिव्ह अॅक्शन, मॉकड्रील, खुनाचा तपास, महिलांवरील अत्याचार यासंदर्भातील छोट्या कालावधीतील कोर्सेसही सुरू करण्यात आलेले आहेत़ यामुळे प्रशिक्षणार्थीला सर्वच बाबतीत ज्ञान मिळते. (प्रतिनिधी)