शिक्षण, समाज व्यवहारात माणुसकी हरवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:43 AM2017-09-16T00:43:32+5:302017-09-16T00:43:38+5:30
अनुदानित, विनाअनुदानित, तासिकापद्धती, शिक्षणसेवक अशा विविध पद्धतीत शिक्षकांची वर्गवारी करून त्यांचे वेतन रोजंदारी कामगारांपेक्षाही कमी करण्यात आले असल्याचे सांगतानाच शिक्षण आणि समाज व्यवहारात माणुसकी हरवली असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.
नाशिक : अनुदानित, विनाअनुदानित, तासिकापद्धती, शिक्षणसेवक अशा विविध पद्धतीत शिक्षकांची वर्गवारी करून त्यांचे वेतन रोजंदारी कामगारांपेक्षाही कमी करण्यात आले असल्याचे सांगतानाच शिक्षण आणि समाज व्यवहारात माणुसकी हरवली असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय नाशिक व नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित आदर्श शिक्षक गौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख, सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्यवाह अभिजित बगदे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, किशोर पाठक, भानुदास शौचे आदी उपस्थित होते. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संगीत क्षेत्रातील अलका देव मारुलकर, क्रीडा विभागातील मोनिका आथरे व व्यावसायिक विभागात धनंजय बंगाळ या विशेष पुरस्कारार्थींसह प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व सेवानिवृत्त शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात शिक्षण देऊन रुजवलेली शिक्षण प्रणाली आजचा व्यावहारिक समाज आणि शासन मुळापासून उपटू पाहत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच बदलत्या काळानुरूप शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञानदानाचे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. रमेश देशमुख यांनी प्रास्ताविक, तर अमृता कवीशकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता बाफना यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी शिक्षक
पुरस्कारार्थींमध्ये रोहिदास गोसावी, श्रीकृष्ण आवारे, पूनम मीरचंदानी, विद्या पाटील, डॉ. डी. एस. अहेर या प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिक विभागातील डॉ. गजानन आंभोरे, माधुरी देशपांडे, शोभा आरोटे, सुनीता बुरकुले यांचा समावेश आहे, तर उच्च माध्यमिक विभागात प्रा. स्वाती शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयीन विभागात डॉ. मंजूषा कुलकर्णी, रमेश वरखेडे, सुचिता पाटील यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागात मीनाक्षी गवळी, कला विभागात विद्या देशपांडे, शास्त्रीय संगीत विभागात विद्या ओक यांनाही पुरस्काराने गौैरविण्यात आले. सेवानिवृत्तांमध्ये दिनेश म्हात्रे, चंद्रकांत जामदार, प्रा. विजय भट, मिलिंद चिंधडे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.