नाशकात शैक्षणिक वारसा संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:36 AM2019-04-24T00:36:21+5:302019-04-24T00:36:37+5:30

गेल्या शतकापासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे.

 Educational Heritage Museum in Nashik | नाशकात शैक्षणिक वारसा संग्रहालय

नाशकात शैक्षणिक वारसा संग्रहालय

googlenewsNext

नाशिक : गेल्या शतकापासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी १९२० मध्ये पायाभरणी केलेल्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये १९१७ पासून संग्रहालयाच्या पायाभूत उभारणीचे काम सुरू असून, या माध्यमातून नाशिकसह संपूर्ण राज्य आणि भारतातील शिक्षण, संस्कृती आणि शिक्षणाच्या विकासाशी संबंधित साहित्याचे प्रदर्शन, संरक्षण, जतन व संशोधन येथे करण्यात येणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संग्रहालयाचे एकूण तीन विभाग असून पहिल्या विभागात जगाचा, दुसºया विभागात देशाचा शैक्षणिक इतिहास मांडण्यात येणार आहे. तर तिसºया विभागात संस्थेचा चित्ररुपी इतिहास रेखाटण्यात येईल. संग्रहालयाविषयी माहिती देताना नीलिमा पवार म्हणाल्या, जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत. त्यापैकी वारसा आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधित्व करणारी केवळ दोनच संग्रहालये आहेत. मविप्रने स्थापन केलेले हे तिसरे संग्रहालय ठरणार आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केलेल्या गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग येथे मागील तीन वर्षांपासून संग्रहालय उभारणीचे काम सुरू असून, या संग्रहालयाद्वारे भारतीय शिक्षण प्रशिक्षण विकास, स्थानिक व ग्रामीण शाळांचा उदय व इतिहास, शालेय इतिहासाची उक्रांती आणि शैक्षणिक वारसा आदी विषयांवर प्रदर्शने भरविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, भुजंगराव बोबडे, डॉ. सुनील ढिकले, राघो अहिरे, नानासाहेब महाले, सचिन पिंगळे, धनंजय शिंदे, डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एन. एस. पाटील, रमेश पडवळ उपस्थित होते.
ऐतिहासिक दस्त, वस्तू दान करण्याचे आवाहन
भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयात काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कलाकृतींचे संकलनही केले जाणार आहे. यात शैक्षणिक व हस्तलिखित साधने, पुस्तके, पारितोषिके, प्रमाणपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रे आणि इतर दुर्मीळ बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास ७३ लाख ईबुक, २ लाख पीएच.डी.चे प्रबंध, २८ लाख हस्तलिखितांच्या पानांचा डिजिटल डाटा उपलब्ध झाला आहे. हा संग्रह आणखी समृद्ध करण्यासाठी ऐतिहासिक मूल्य व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या कलाकृतींचे दान संग्रहालयास करण्याचे आवाहन सरचिटणीस नीलिमा पवार यांनी यावेळी केले.

Web Title:  Educational Heritage Museum in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.