द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्पच ७० कंटेनर निर्यात : सहा हजार कंटेनरची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:07 AM2017-12-03T01:07:55+5:302017-12-03T01:08:54+5:30
जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाण तालुका व परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सांगण्यात आले.
मागील आठ दिवसांत रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे सांगितले जाते. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्याचे चित्र होते. मात्र नंतर हवामान चांगलं राहिल्याने निर्यातक्षम द्राक्षबागांना त्याचा फायदाच झाला. आॅक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था होती. मध्यंतरी अचानक ढगाळ हवामान होऊन पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यांत झाल्या होत्या. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण समजू शकले नव्हते. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असल्याुमळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शेतकºयांना द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजार १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात तीन हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागांतील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांची आतापर्यंत १५ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होऊ शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकुण या हंगामात ७० ते ८० द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे.
मध्यंतरीच्या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. मात्र वातावरण चांगले असल्याने निर्यातक्षम द्राक्षांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मागील वर्षी ६५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात परदेशात झाली. यंदा सहा हजार कंटेनरच्या आसपास द्राक्ष कंटेनरची निर्यात होईल.