नाशिकरोड रेल्वेस्थानकात दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:59 AM2019-02-28T00:59:20+5:302019-02-28T00:59:38+5:30
भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला
नाशिकरोड : भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वान ‘स्पाईक’च्या साह्याने तपासणी केली जात आहे.
काश्मीरमधील पुलवामा येथे गेल्या आठवड्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर मंगळवारी पहाटे बॉम्ब टाकून हल्ला करत दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. गेल्या दोन दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवून बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वान ‘स्पाईक’च्या मदतीने उपनिरीक्षक नीळकंठ दुसाने, हवालदार रोहिदास लोंढे, सचिन पवार, मोहन शेटे यांनी बुधवारी सायंकाळी तपासणी केली.
हायअलर्ट देण्यात आल्याने नाशिकरोड, देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर हत्यारधारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. रेल्वे येण्याच्या व जाण्याच्या वेळेस बंदोबस्तात वाढ करून साध्या वेषातील पोलीस गस्त घालत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सर्वत्र लक्ष दिले जात आहे.