स्पेशल रिपोर्ट! नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; वनखात्याने तैनात केले १७ पिंजरे 

By अझहर शेख | Published: April 14, 2023 06:37 PM2023-04-14T18:37:38+5:302023-04-14T18:37:59+5:30

नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

 Efforts are being made on a war footing to imprison leopards in Nashik  | स्पेशल रिपोर्ट! नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; वनखात्याने तैनात केले १७ पिंजरे 

स्पेशल रिपोर्ट! नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; वनखात्याने तैनात केले १७ पिंजरे 

googlenewsNext

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नाशिक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील पिंपळद गावाच्या शिवारात वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी आठवडाभरापासून तंबू ठोकला आहे. या भागात मानवी हल्ले करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने १७ पिंजरे व २५ ट्रॅप कॅमेऱ्यांचा सापळा रचला आहे. बिबट्या सातत्याने वनपथकांना हुलकावणी देत आहे. दरम्यान, गावकऱ्यांकडून या बिबट्याला ठार मारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पश्चिम वनविभागाने मात्र  बिबट्याला जीवंत पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहे.

पिंपळद शिवारात ६ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वर्षांची देविका भाऊसाहेब सकाळे ही पायी घरी जात असताना बिबट्याने झाडीझुडुपातून येत तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्दैवाने तीचा मृत्यू झाला होता. यानंतर पिंपळद पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये तीव संताप व रोष निर्माण झाला होता. वनविभागाने दिलेला प्रतीसाद व सुरू केलेल्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे आता गावकऱ्यांकडून वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य मिळू लागले आहे. यानंतर वनविभागाने तातडीने पिंपळद भागात दाखल होत तळ ठोकला आहे. उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी वनकर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेत या भागात सर्वत्र ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न वनविभागाकडून केले जात आहे. तीन ड्रोनद्वारे परिसरात टेहळणी करत बिबट्यांच्या हालचाल टिपण्याचा प्रयत्नही केला जात आहे. दुर्बिणीतूनही ‘वॉच’ ठेवला जात आहे.

पायांचे ठसे एकसारखेच!
पिंपळद भागात पायी गस्तीदरम्यान वन रक्षकांना आढळून आलेले बिबट्याच्या पायांचे ठसे हे एकसारखेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या भागात एकच बिबट्या मुक्त संचार करत असल्याची दाट श्यक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हा बिबट्या एक तर मादी असावी किंवा तो मध्यम वयाचा प्रौढ नर असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पिंजऱ्यांत शेळ्या अन् कोंबड्या
बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या १७ पिंजऱ्यांत शेळ्या व कोंबड्यांचे सावज वनकर्मचाऱ्यांनी ठेवून सर्वच पिंजरे ‘ॲक्टीव्ह’ केले आहेत. पिंपळद, वेळुंजे, ब्राम्हणवाडे या पंचक्रोशीत एकुण १७ पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच बिबट्याचा माग काढण्यासाठी जागोजागी २५ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत; मात्र अद्याप एकाही कॅमेऱ्यात बिबट्याची छबी कैद होऊ शकलेली नाही.
 
बिबट्याची सतत हुलकावणी!
या भागात संचार करणारा बिबट्या सातत्याने वन गस्ती पथकांना हुलकावणी देत आहेत. येथील एकाही पिंजऱ्याजवळ बिबट्या मागील चार ते पाच दिवसांत फिरकलेला नाही; मात्र त्याने गेल्या चार दिवसांत दोन श्वानांची शिकार केल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावून तटबंदी जरी केलेली असली तरी तो अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही.

...तर गोळ्या घालण्याची मागणार परवानगी!
वन बल प्रमुखांच्या कार्यालयाने बिबट्याला प्रथमत: ट्रॅन्क्युलाईज करून पिंजऱ्यात जेरबंद करण्याची परवानगी दिली आहे. तसेच मानवी हल्ला झालेल्या भागात जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहे. या प्रयत्नांना यश न आल्यास पश्चिम उपवनसंरक्षकांकडून बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी मागितली जाऊ शकते, असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.

पिंपळद गावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर २५ ते ३० वनकर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहेत. मुख्य वन बलप्रमुख कार्यालयाने बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहे; मात्र अद्याप बिबट्याला ठार मारण्याची परवानगी स्थानिक कार्यालयाने मागितलेली नाही. हे प्रयत्न अयशस्वी होत असल्याची खात्री पटल्यानंतर तशी परवानगी मागितली जाईल, त्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे. - पंकज कुमार गर्ग, उपवनसंरक्षक, पश्चिम वनविभाग, नाशिक

त्र्यंबकेश्वरजवळील बिबट्याचे मानवी हल्ले!
दिनांक ----------- गाव- -------------- मयत

  1. ६ एप्रिल २०२३ : पिंपळद- देविका भाऊसाहेब सकाळे (वय ६)
  2. १५ मार्च २०२३ : ब्राम्हणवाडे- नयना कोरडे (वय३)
  3. २४ डिसेंबर २०२२ : वेळुंजे- हरीश निवृत्ती दिवटे (वय६)
  4. ४ जुलै २०२२: धुमोडी- ऋुचिता एकनाथ वाघ (वय ८)
  5. २७ एप्रिल २०२२: धोंडेगाव - गायत्री लिलके (वय ६)

 

Web Title:  Efforts are being made on a war footing to imprison leopards in Nashik 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.