जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्रासाठी प्रयत्नांची गरज - व्ही. बी. गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:22+5:302021-06-27T04:11:22+5:30
उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे केंद्रथान नाशिक हे आहे. आज मितीस कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, स्थापत्य, वैद्यकीय औषध निर्माण व विधी ...
उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे केंद्रथान नाशिक हे आहे. आज मितीस कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, स्थापत्य, वैद्यकीय औषध
निर्माण व विधी शिक्षणा बरोबरच उच्च शिक्षणातील जवळपास सर्वच अभ्यासक्रम नाशिक मधील शासकीय व खासगी महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. नाशिक मध्ये खासगी शैक्षणिक संस्थाबरोबरच काही खासगी विद्यापीठांनी आपले पाय रोवले आहेत. उच्च शिक्षणातील वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम देण्यास नाशिकमधील अनेक संस्था व महाविद्यालये प्रयत्नशील आहेत. खासगी विद्यापीठ व काही संस्था/महाविद्यालय स्वायत्त असल्यामुळे उच्च शिक्षणामधील योग्य ती गुणवत्ता राखणे शक्य आहे. तसेच शैक्षणिक स्वायत्तेमुळे दर्जेदार व अद्ययावत अभ्यासक्रम तयार करून ते राबविता येतात.
नाशिक मध्ये सातपूर,अंबड, सिन्नर (माळेगाव, मुसळगाव), ओझर, दिडोरी, विल्होळी व इतर काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे. व्यावसायीक प्रशिक्षित असणारे विद्यार्थी ही बहुतांशी उद्योगांची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रांमधील उद्योगांशी करार किंवा सहयोगी पद्धतीने काही अभ्यासक्रम सुरु करता येतील. यामधून उद्योगांना लागणारा रोजगार हा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकेल. एकविसावे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे तसेच जागतिकीकरणाचे व खाजगीकरणाचे म्हणुन ओळखले जाते. भारतातील उच्च शिक्षणाची दिशा जागतिकीकरणाच्या संदर्भात झपाट्याने परिवर्तीत होत आहे. नाशिक मधील उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम हा समकालीन गरजांवर आधारित समस्या सोडविणारा, व्यापार उदयोजिकतेला चालना देणारा असावा. उगवत्या तंत्रज्ञानाला समरूप असे अभासक्रम तयार करून ते नाशिकसारख्या शैक्षणिक केंद्र असणाऱ्या ठिकाणी सुरु करणे गरजेचे आहे.आज नाशिक शहरातच नव्हे तर जिल्हाभरात गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. परंतु उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे नावाजलेले एखादे विद्यापीठ किंवा राष्ट्रीय पातळीवरची संस्था नाशिक मध्ये नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार परदेशी विद्यापीठांना प्रवेश करणे शक्य आहे. तसेच खासगी विद्यापीठ उभारण्याची प्रक्रियादेखील सुलभ झाली आहे. या संधीचा लाभ नाशिकला घेता येईल उच्च शिक्षणातील संशोधन क्षेत्राचा विस्तार करण्यास देखील वाव आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात विविध मुलभूत व उपयोजित विषयांध्ये संशोधन सुरु आहे. त्याला अधिक बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरची एखादी संशोधन संस्था देखील नाशिक मध्ये उभारता येऊ शकते.
थोडक्यात साहित्यिक व अध्यात्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या व स्मार्ट सीटीकडेकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरात उच्च शिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती दुरदृष्टी ठेवून शैक्षणिक धोरण आखणाच्या द्ष्ट्यांची, शिक्षण संस्था चालवणाच्या धुरिणांची व राजकीय पाठबळाची, त्यातूनच उच्च शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात नाशिक आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकेल व नाशिकमधील उच्चशिक्षित युवक हे उदयोन्मुख भारताचे प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करु शकतील.
-डॉ. व्ही, बी, गायकवाड प्राचार्य, के.टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक.
व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
माजी संचालक, विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे