ग्रामीण भागात नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:32 PM2020-09-15T23:32:13+5:302020-09-16T01:00:26+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळेवर डॉक्टर तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, औषध उपचार न होणे या विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. त्यावर मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामीण भागासाठी नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागासाठी औषध खरेदीच्या विषयावर चर्चेत सहभागी होताना अनेक सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर तक्रारी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

रुग्णालयातील डॉक्टर स्वत: क्वारंटाइन झाल्यावर पर्यायी वैद्यकीय अधिकारी नेमला जात नाही, उलट आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात येते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली.
रुपांजली माळेकर, आत्माराम कुंभारडे, भास्कर गावित, नूतन आहेर आदींनी एनआरएचएमवर झालेल्या खर्चाची माहिती मिळत नसल्याचे सांगून, सर्व कामांची चौकशी करावी व मगच देयके अदा करावी, अशी मागणी केली. यावेळी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी १०८ रुग्णवाहिकेचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे व त्यांना त्यांचा मार्ग ठरवून देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ४३ रुग्णवाहिका असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याने त्यावर उपाय म्हणून काही खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात येतील तसेच, मानव विकास व नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाबाबत सदस्यांच्या असलेल्या तक्रारी विचारात घेऊन, लवकरच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल व त्यात ज्या सदस्यांची तक्रार आहे त्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले.लॉकडाऊनच्या काळात ५० लाखांची कामे या सभेत नूतन आहेर, सिद्धार्थ वणारसे यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन असताना एका विशिष्ट गटात ५० लाखांची सेस निधीचे कामे कशी केली गेली असा प्रश्न विचारला. या कामांना कोणी मंजुरी दिली, कोणाच्या परवानगीने कामे झाली आणि एका महिन्यात ५० लाखांची कामे लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना कसे पूर्ण झाले अशा प्रश्नांची सरबत्ती केली. याच अनुषंगाने आहेर यांनी देवळा नगर पंचायत क्षेत्रात काम सुरू असताना सदस्य म्हणून आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सांगून या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देणे, कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका नसणे हे प्रकार सातत्याने घडत असून, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका संपर्क करूनही मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. राष्ट्रीय हेल्थ मिशन व आरोग्यवर्धिनीअंतर्गत सारखेच कामे केली जात असून, दोन्ही कामांचे देयके काढली जात असल्याची तक्रार यावेळी अनेक सदस्यांनी केली.