वाढत्या रुग्णसंख्येनुसार रुग्णालय उभारणीचे प्रयत्न : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:09 PM2020-05-08T22:09:05+5:302020-05-08T23:58:29+5:30
मालेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मालेगाव शहरात महत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सर्व पर्याय पडताळून त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी (दि.८) दिले.
मालेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मालेगाव शहरात महत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सर्व पर्याय पडताळून त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी (दि.८) दिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासगी डॉक्टरांनीदेखील सामाजिक दायित्वातून रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. आरोग्य प्रशासनाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना व नॉन कोरोना या दोन्ही आघाड्यांवर समसमान लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी नवीन रुग्णालयाची बांधणी करायची झाल्यास त्यासाठी सर्वाधिकार असलेली समिती डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. तिला सुरुवातीलाच तहसीलदाराकडे वर्ग केलेले ५० लक्ष रुपये निधीतून आवश्यकतेप्रमाणे खर्च करण्याचे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
मालेगाव येथील स्वॅब नमुन्यांच्या तपासणीसाठी होत असलेला विलंब दूर करण्याकरिता धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात दिवसाला पाच हजार स्वॅब तपासणीची सुविधा नव्याने सुरु करून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून ३८ लक्ष रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास गती मिळेल. वैद्यकीय उपचारांच्या आवश्यक साधन सामग्रीसाठी निधीची कमतरता नाही. उपलब्ध सर्व रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांसह पिण्याचे पाणी व सकस आहाराचा नियमित पुरवठा करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दाखल रुग्णांमध्ये हाय रिस्क व लो रिस्क रुग्णांच्या संख्या तपासून त्यांची शक्यता पडताळून स्वॅब तपासणीची दिशा ठरविण्यात यावी. आरोग्य सुविधेचे स्ट्रक्चर उभारून त्यासाठी लागणारा आवश्यक स्टाफ हा आरोग्य संचालनालयाकडून उपलब्ध होणार असल्याने त्याचे सूक्ष्म नियोजन करून चांगल्या आरोग्य सुविधांवर भर द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंंह, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंंदे, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-----
वेतनाबाबतच्या १०५ तक्रारी
लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्व पॉवरलूम बंद आहेत. नाशिक विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मजुरांची संख्या मालेगावात आहे. या कालावधीत मजुरांना वेतन अदा करण्याचे आदेश शासनाने दिले असताना जवळपास १०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तत्काळ निकाली काढाव्यात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्तांना दिले.