मुलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न व्हावा : महेश झगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:21 AM2017-11-05T00:21:50+5:302017-11-05T00:21:57+5:30
: मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच शारीरिक विकास हादेखील महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
नाशिकरोड : मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच शारीरिक विकास हादेखील महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॉमर्स मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर सायन्स कॉलेज नाशिक येथे ‘चला खेळू’ या कार्यक्रमात बोलताना झगडे म्हणाले की, या कार्यक्रमात जोपर्यंत व्यवस्थापन उतरत नाही तोपर्यंत हे अभियान पूर्ण होणार नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना खेळाच्या मैदानात उतरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी हा शाळा-महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त वेळ असल्याने मुलांना खेळाचे महत्त्व पटविणे ही शाळा व महाविद्यालयांची जबाबदारी आहे. पुढची पिढी घडवायची असेल तर त्यांना खेळाचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे आहे, असे झगडे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त महसूल दिलीप स्वामी, क्रीडा उपसंचालक जयप्रकाळ दुबळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्राचार्य शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
शारीरिक सुदृढता टिकवून ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. मुलांनी आपल्या दैनंदिन जीवनात खेळासाठी वेळे देणे आवश्यक आहे. खेळ आनंद तर देतोच, पण आपल्या शारीरिक क्षमताही वाढवितो. शालेय जीवनामध्ये कच्चा दुवा राहिल्यास त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर होतो. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शिक्षकांनीदेखील अभ्यास करून काळानुरूप स्वत:ची गुणवत्ताही टिकवणे महत्त्वाचे आहे, असेही झगडे यांनी सांगितले.