नैतिकता जपण्यासाठीच प्रयत्न : भारतीताई ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:51 AM2019-10-08T00:51:12+5:302019-10-08T00:52:03+5:30
नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही.
नाशिक : नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही. त्यामुळे शिक्षक म्हणून शिकविण्याची नैतिकता जपण्यासाठीच आपण सरकारी अनुदान नाकारल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक भारतीताई ठाकूर यांनी सांगितले.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.७) आयोजित सोहळ्यात नर्मदा खोऱ्यातील लेपा येथे नर्मदालय संस्थेच्या माध्यमातून आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी शिक्षणासोबतच आरोग्याचे काम करणाºया ज्येष्ठ समाजसेवक तथा नर्मदालयच्या संस्थापक भारतीताई ठाकूर यांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री विनायकदादा पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, खासदार भारती पवार, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, वसंत खैरनार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकूर यांनी सुरुवातीपासून ते नर्मदालयाच्या उभारणीपर्यंतचा प्रवास नाशिककरांना उलगडून सांगितला. प्रास्ताविक रंजना पाटील यांनी केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश मंत्री यांनी आभार मानले.
अभ्यासक्रमात डोकाविण्याची गरज
ग्रामीण भागातील लहान मुले ही कुटुंबासोबतच शेतीची आणि मजुरीची कामे करून मोठी होतात. त्याला काही लोक बालमजुरी म्हणत असले तरी यातून जीवनशिक्षण मिळत असते. या जीवन शिक्षणातून मिळणारी आपुलकी, संस्कार आजच्या शहरी शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करीत ठाकूर यांनी शिक्षण संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात डोकावून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.